Rupali Patil Thombre News, Political News Sarkarnama
पुणे

साडेपाच महिन्यांनंतर अखेर रुपाली पाटलांवर राष्ट्रवादीनं टाकली मोठी जबाबदारी

रुपाली पाटील यांनी मागील वर्षी मनसे सोडून राष्ट्रवादीत केला होता प्रवेश

सरकारनामा ब्युरो

मुंबई : माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रसेच्या वतीनं त्या आक्रमकपणे मैदानात उतरताना दिसत होत्या. पण त्यांच्यावर पक्षाने अधिकृत कोणतीच जबाबदारी सोपवली नव्हती. अखेर साडेपाच महिन्यानंतर पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

फायरब्रँड नेत्या असलेल्या रूपाली पाटील यांची राष्ट्रवादीच्या पुणे उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षांची निवड झाली. त्यावेळीही त्यांचे नाव चर्चेत होते. मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही त्या कायम चर्चेत होत्या. राष्ट्रवादीच्या आंदोलनात आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पुणे महापालिकेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल्यानंतर लगेचच रूपाली पाटील यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे.

मूळच्या वकील असलेल्या रुपाली पाटील या मनसेच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या १४ वर्षापासून राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. या काळात महापालिकेच्या २०१२ निवडणुकीत त्या मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झाल्या. त्यानंतरच्या २०१७ च्या निवडणुकांत त्यांचा पराभव झाला तरीही त्या राजकारणात सक्रिय राहिल्या आणि विधानसभेच्या २०१९ निवडणुकीत त्या कसबा मतदारसंघातून मनसेकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या.

पाटील यांच्याऐवजी त्यावेळचे मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना उमेदवारी मिळाली आणि रुपाली पाटील पक्ष नेतृत्वावर नाराज झाल्या. भाजपच्या नेत्यांशी सेटिंग करून आपले तिकिट कापल्याची भावना त्यांच्या मनात होती. रुपाली पाटील यांची नाराजी ओळखून पक्षाने त्यांच्यावर महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. ती पार पाडताना त्या अधिक आक्रमक झाल्या.

पुणे पदवीधर मतदारसंघातूनही रुपाली पाटील यांनी नशीब आजमावले मात्र, त्या पराभूत झाल्या. या निवडणुकीत पक्षाच्या नेत्यांनी 'मनसे' साथ दिली नसल्याची खंत त्या खासगीत बोलून दाखवत होत्या. मनसे सोडण्याच्या विचारापर्यंत आलेल्या रुपाली पाटील यांच्याकडील महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेऊन प्रदेश उपाध्यक्षपद देऊन त्यांची बोळवण करण्यात होती. मात्र, हे पद काढण्याआधी काही मिनिटेच कल्पना दिली. पक्षातील काही नेत्यांनी ठरवूनच काटा काढल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी त्यावेळी उघडपणे केला होता.

मनसेचा राजीनामा देण्याआधी रुपाली या युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची सह्याद्री अतिथिगृहात भेट घेऊन चर्चा केल्याने त्या शिवसेनेत जाणार, याची चर्चा रंगली होती. सरदेसाई यांच्या आधी रुपाली पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटल्या आणि राष्ट्रवादीतील प्रवेशाचा मुहूर्तही ठरल्याचे बोलले जात होते. त्यामुळे रुपाली या आपल्या मनगटावर घड्याळ की शिवबंधन याकडे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी मागील वर्षी १६ डिसेंबरला राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT