Shivajirao Konde joins Congress
Shivajirao Konde joins Congress Sarkarnama
पुणे

संग्राम थोपटेंचा राष्ट्रवादीला मोठा धक्का : बुजूर्ग नेते शिवाजीराव कोंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

किरण भदे

नसरापूर (जि. पुणे) : काँग्रेसचे (congress) भोरचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) तालुक्यात धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव कोंडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळकृष्ण दळवी आणि देगावचे माजी सरपंच अशोक शेलार यांनी राष्ट्रवादीला रामराम करत आज (ता. २८ एप्रिल) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (NCP leader Shivajirao Konde joins Congress)

भोर येथे काँग्रेसच्या कार्यालयात आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. थोपटे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेषतः सातारा महामार्गाच्या पठ्ठ्यात कोंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद नक्कीच कमी झाली आहे.

आमदार संग्राम थोपटे म्हणाले, ‘‘शिवाजीराव कोंडे व इतरांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांचा पक्षात योग्य तो मानसन्मान ठेवला जाईल.’’ राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने भोर तालुक्यात मोठी उलथापालथ होत आहे. एकेकाळी राजगड कारखान्याचे संचालक, त्यानंतर उपाध्यक्ष असलेले महामार्ग पट्ट्यातील वजनदार पहिलवान शिवाजीराव कोंडे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक अपक्ष जिंकली होती. त्यांनी आज राष्ट्रवादीचा त्याग करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या समवेत त्यांच्याच काळातील कारखान्याचे माजी संचालक, देगावचे माजी सरपंच अशोक शेलार, जिल्हा परिषदचे माजी पशुसंवर्धन सभापती बाळकृष्ण दळवी यांनीही प्रवेश केला आहे. कोंडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भोर तालुका राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवाजीराव कोंडे १९९६ ते २००० या कालावधीत राजगड कारखान्याचे उपाध्यक्ष होते. जिल्हा परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने २००७ मध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पराभूत करुन ते जिल्हा परिषद सदस्य झाले होते. मात्र, २०१२ मध्ये राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी असताना त्यांच्याच गावचे तरुण उमेदवार कुलदीप कोंडे यांच्याकडून ते पराभूत झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये सक्रिय असले तरीही त्यांच्याकडे कोणतेही पद नव्हते. काँग्रेस प्रवेशामुळे राजगड कारखान्याचे संचालक किंवा उपाध्यक्ष पद मिळून ते पुन्हा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

या वेळी काँग्रेसचे भोर तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, पंचायत समितीचे उपसभापती रोहन बाठे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, कृष्णाजी शिनगारे, विकास कोंडे, धनंजय वाडकर आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT