Ashok pawar Sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना ठार मारण्याची धमकी; शिरूरमध्ये खळबळ

एका दिवशी भरचौकात यांचाही महेंद्र मल्लावसारखा कार्यक्रम होणार, अशी धमकीची भाषा या पत्रात वापरण्यात आली आहे.

नितीन बारवकर

शिरूर : शिरूर-हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ॲड. अशोक पवार यांचा ‘एखाद्या दिवशी भरचौकात यांचा महेंद्र मल्लावसारखा कार्यक्रम होणार,’ अशी भाषा वापरत त्यांना जीवे मारण्याची धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली आहे. या पत्रामुळे शिरूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. हे पत्र शिरूर नगरपालिकेतील गटनेते प्रकाश धारिवाल यांना उद्देशून लिहिण्यात आले आहे. (NCP MLA Ashok Pawar threatened to kill)

दरम्यान, नगरसेवक महेंद्र मल्लाव यांचा भरचौकात गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्याच पद्धतीने जीवे मारण्याची धमकी या पत्रातून अशोक पवार यांना देण्यात आलेली आहे.

शिरूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिण्यात आलेले आहे, त्यात आमदार अशोक पवार यांचा पालिकेतील हस्तक्षेप वाढल्याचा आक्षेप घेत त्यांच्यावर विविध आरोप करण्यात आले आहेत. त्यांचा नगरपालिकेच्या पाबळ फाट्यावरील तसेच कुकडीच्या जमिनीवर डोळा असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. तसेच, प्रकाश धारिवाल यांच्याशिवाय आमदार पवार शहरात फिरले तर त्यांना कोणीही विचारणार नाही. तुम्हाशी गोड गोड बोलून तुम्हाला मान दिल्यासारखे करतात. पण, त्यांचा नगरपालिका ताब्यात घेण्याचा डाव आहे, असेही त्या व्यक्तीने पत्रात नमूद केले आहे. टपऱ्या पाडल्याचा जाबही विचारण्यात आला आहे.

आमदारांबरोबरच त्यांची पत्नी आणि मुलगाही नगरपालिकेत बैठका घेत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. आमदारांना दुसरं कोणी मोठं झाल्याचं बघवत नाही. पण, एका दिवशी भरचौकात यांचाही महेंद्र मल्लावसारखा कार्यक्रम होणार, अशी धमकीची भाषा या पत्रात वापरण्यात आली आहे. प्रकाश धारिवाल यांनी आमचा नेता असल्यासारखं वागावं. आमदारांच्या नादी लागला तर नगरपालिका तुमच्या हातून जाईल. जनतेच्या तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भ्रष्टाचारी लोकांना बाजूला सारा. रात्र वैऱ्याची आहे. बाकी पुढच्या पत्रात...असाही उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT