MLA Anil Bhosale
MLA Anil Bhosale Sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंच्या जमीनीला सोन्याचा भाव; पुणे बाजार समिती खरेदीदार

सरकारनामा ब्युरो

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले (Anil Bhosle) यांच्या ताब्यात असलेल्या मौजे कोरेगाव मूळ (ता. हवेली, जि. पुणे) येथील पुणे-सोलापूर हायवे लगत ५.५२ हेक्टर (सुमारे १३ एकर) जमिनीची जाहीर लिलाव प्रक्रिया आज पार पडली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने या लिलावात सहभागी होऊन रु ६० कोटी ४१ लाख ७४ हजार ७०९ या रकमेस सदरची जमीन जाहीर लिलावद्वारे खरेदी केली आहे. एकरी जवळपास ४ कोटी ६१ लाख एवढा मोठा दर या जमीनीला मिळाला आहे. (Anil Bhosle | NCP | Latest News)

आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारांमुळे अवसायनात काढण्यात आलेल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्या कर्जखात्यांतर्गत असलेल्या जमिनीची विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश (एमपीआयडी कोर्ट) यांनी जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याबाबत १७ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या आदेशान्वये परवानगी दिलेली होती. त्यानुसार बँकेने ही लिलाव प्रक्रिया निश्चित केली होती. याच लिलावात पुणे बाजार समितीने या जमीनीची खरेदी केली आहे.

भविष्यातील वाढते नागरीकरण, नियोजित रिंग रोड, शेतकरी व सर्व बाजार घटकांची सुविधा विचारात घेवून या ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधांसह उपबाजार कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या खर्चात आणि वेळेत बचत होणार आहे. तसेच गुलटेकडी मार्केट यार्ड येथे परराज्यातून अवजड वाहनांतून येणारा गाजर, वाटाणा, मिरची, फळेभाजीपाला, कांदा बटाटा व इतर शेतीमाल या ठिकाणी विक्री करता येणार आहे.

सदरची जमीन उरुळी कांचन रेल्वे स्थानकानजीक असल्यामुळे राज्यातील आणि परराज्यातील शेतकरी व व्यापारी यांना कमी खर्चात रेल्वेने शेतीमालच आवक-जावक सोयीची आणि फायद्याची होईल. त्यामुळे गुलटेकडी मार्केट यार्ड येथे येणाऱ्या अवजड वाहनांची संख्याही कमी होईल, वाहतूक खर्चात बचत होईल, प्रदुषण काही प्रमाणात कमी होईल, तसेच गुलटेकडी मुख्य मार्केटवरील ताण कमी होईल. या नियोजित उपबाजारामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT