Amol Kolhe | Ncp News I Nitesh Rane | Pimpri News
Amol Kolhe | Ncp News I Nitesh Rane | Pimpri News  Sarkarnama
पुणे

Ncp News : नितेश राणेंच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक!

सरकारनामा ब्यूरो

Amol Kolhe News : कोकणातील कणकवलीचे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिरूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर नुकतीच शिवराळ भाषेत असभ्य टीका केली होती. त्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने शुक्रवारी (ता.१३) आंदोलन केले. तर महिला शहर राष्ट्रवादीने थेट पोलिस ठाण्यात राणेंविरुद्ध तक्रार दिली.

महागाई आणि बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच आक्षेपार्ह आणि वाद्‌ग्रस्त विधाने करण्याचा भाजप नेत्यांचा डाव आणि त्याव्दारे आमच्या नेत्यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पिंपरी चौकातील या आंदोलनात दिला.'हल्लाबोल हल्लाबोल नितेश राणे हल्लाबोल... चप्पल लेके हल्लोबोल, पत्थर लेके हल्लाबोल... दंडा लेके हल्लाबोल..' 'माफी मागो माफी मागो नितेश राणे माफी मागो..या घोषणांनी आंदोलकांनी परिसर काही काळ दणाणून सोडला.

खासदार कोल्हेंचा एकेरी उल्लेख करीत २०२४ ला त्यांना आपटून टाकू, पैशासाठी ते शिवाजी महाराजांची भूमिका करतात, दाढी काढली, तर त्यांना कोणी ओळखणार सुद्धा नाही,अशी भाषा नितेश राणेंनी नुकतीच कोल्हेंच्या बाबतीत वापरल्याचे पडसाद राज्यात व त्यातही शिरूर मतदारसंघात उमटत आहेत. काल पिंपरीत ते उमटले. त्यात गव्हाणेंसह माजी महापौर संजोग वाघेरे, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, प्रवीण भालेकर,अतुल शितोळे, निकिता कदम, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

भाजप जाणीवपूर्वक चुकींच्या गोष्टींना खतपाणी घालून देशातले वातावरण खराब करण्याचे काम करत असल्याचा आरोप गव्हाणेंनी यावेळी केला. ज्यांची पात्रता नाही, अशी माणसे अजित पवार आणि पवार कुटुंबावर बोलतात. आमदार गोपीचंद पडळकर यांना तर नैतिक अधिष्ठान नाही, राजकीय उंचीही नाही, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. अमोल कोल्हे हे अभिनयाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास समाजापर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत. ते पाहूनच त्यांना शिरूरच्या जनतेने निवडून दिले. खासदार म्हणून उत्कृष्ट काम करीत त्यांनी मतदारसंघातील प्रश्‍न मार्गी लावले आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राणेंनी कोल्हेविषयी अत्यंत खालच्या थराला जाऊन गलिच्छ असे विधान केल्याने पिंपरी-चिंचवड महिला राष्ट्रवादीने राणेंविरुद्ध पोलिसांत (ता.१२) तक्रार देत त्यांच्यााविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच ही गरळ ओकणाऱ्या राणेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT