Dilip Walse Patil -Devdatta Nikam.jpg Sarkarnama
पुणे

NCP Politics: भीमाशंकर कारखान्याच्या सभेत राडा; वळसे पाटील-निकम समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेले

Deepak Kulkarni

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात सातत्याने खटके उडाल्याचे पाहायला मिळत आहे.दोन्ही गटातून सध्या विस्तवही जात नाही. दोन्ही गटातला संघर्ष लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही आणखी टोक गाठण्याची शक्यता आहे.

अशातच आता पुणे जिल्ह्यातील सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम या दोघांच्या समर्थकांमध्ये जुंपली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार असल्याच्या चर्चा आहे.या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.

याचदरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवेळी अजित पवारांसोबत गेलेल्या बंडखोरांविरोधात शरद पवारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बंडखोरांच्या मतदारसंघात त्यांच्यासमोर तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. वळसे पाटलांच्या विरोधातही आता शरद पवार गटांनी देवदत्त निकमांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे.

आंबेगाव तालुक्यात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या समोरच हा सगळा राडा झाला. भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोन तास गदारोळ सुरू होता. वळसे आणि निकमांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले,खुर्च्या नाचवत हिणवू लागले.

सभेत काय घडलं..?

आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आम्हाला बसू दिलं नाही,मंचावर येऊ दिलं नाही.बैठकीत वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला,हे सगळं घडवून आणण्यासाठी ते गुंड घेऊन आले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते देवदत्त निकम यांनी केला. या मुद्द्यांवरून वळसे आणि निकमांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले,खुर्च्या नाचवत हिणवू लागले.

मंत्री वळसे पाटलांनी शांततेचं आवाहन केलं.मात्र, वेगवेगळ्या कारणांवरून राडा रंगतच राहिला. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केली अन् देवदत्त निकमांना बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली. मग देवदत्त निकमांनी आम्हाला सभेतून हाकलण्यासाठी गुंड आणल्याचा आरोप केला. मात्र, हे सगळे आरोप अजित पवार गटाने फेटाळले आहेत.

अजित पवार गटाचे नेते शिवाजी आढळरावांनी या राड्यावरुन देवदत्त निकमांवर जोरदार पलटवार केला आहे.त्यांनी विनाकारण राजकीय रंग देऊन स्वतःची पोळी भाजुन विघ्नसंतोषीपणा निकम यांनी केला आहे. देशातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या भीमाशंकर कारखान्याच्या वार्षिक बैठकीत हा गदारोळ करून त्यांनी काय साध्य केलं.उलट कारखाना बदनाम करण्याचे प्रयत्न केले,अशी टीका शिवाजी आढळरावांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT