Sharad Pawar, Narendra Modi Sarkarnama
पुणे

Sharad Pawar on PM Modi: शरद पवारांनी मुद्यांसह मोदींच्या आरोपांची केली चिरफाड; म्हणाले...

Political News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर घराणेशाहीचा आरोप करत जोरदार टीका केली होती.

सरकारनामा ब्यूरो

NCP News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्ट्राचाराचा आरोप केला होता. तसेच "शरद पवार यांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मतदान करा", असा हल्लाबोल मोदींनी एका मेळाव्यात बोलताना केला होता. आता यावर प्रतिउत्तर देत शरद पवार यांनी थेट भाष्य केलं आहे. आज ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, "विरोधकांनी घेतलेल्या बैठकीमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अस्वस्थता वाढली आहे. सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, झारखंड, केरळ, तामिळनाडू यासह बहुसंख्य राज्यात भाजपची सत्ता नाही. तर गोवा आणि महाराष्ट्रात आमदार फोडून भाजपने सत्ता आणलेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींची अस्वस्थता वाढत आहे. सध्याचे देशातील आणि राज्यातील चित्र पाहता पुढच्या वर्षी निवडणुका लागण्याची शक्यता आहे", असं शरद पवार म्हणाले.

मोदींनी केलेल्या आरोपांवर पवार काय म्हणाले?

"देशातील आगामी निवडणुकांमध्ये काय होईल, याची खात्री नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पदाला अशोभनीय असे विधाने केले आहेत. उदाहरणार्थ राष्ट्रवादीबद्दल त्यांनी मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, शरद पवारांच्या मुलीला पुढे न्यायचे असेल तर तुम्ही राष्ट्रवादीला मत द्या. हे खरं आहे की, माझी मुलगी स्वतःच्या कर्तृत्वावर तीन वेळेस लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आली. एखाद्या वेळी कुटुंबाची पुण्याई उपयोगी पडते. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या निवडणुकीत नाही".

"सुप्रिया सुळे यांची संसदेच्या कामगिरीत 98 ते 99 टक्के उपस्थिती असते. संसदेत प्रश्न विचारण्यात त्यांचा पहिला क्रमांक आहे. संसदेतील चांगल्या कामगिरीचा अभ्यास करुन खासदारांना पुरस्कार देण्यात येतो. सुप्रिया सुळे यांना हा पुरस्कार आठ वेळेला मिळाला आहे. त्यामुळं मोदी काहीही म्हटले तरी स्वतःचं कर्तृत्व असल्याशिवाय या देशातील मतदार नेहमीच मतं देत नाहीत", अशा परखड शब्दात शरद पवार यांनी मोदींना प्रतिउत्तर दिलं आहे.

शिखर बँकेच्या आरोपांवर पवार काय म्हणाले?

"मी कुठल्याही बँकेचा सभासत नाही. मी कुठल्या सहकारी बँकेकडून कर्ज देखील घेतलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अशा कुठल्या बँकेबाबत उल्लेख करण्याची गरज नव्हती. पण निराशापोटी त्यांनी हा आरोप केला असावा", असं म्हणत मोदींनी केलेल्या आरोपांवर शरद पवार यांनी प्रतिउत्तर दिलं.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राष्ट्रवादी पक्षावर तब्बल 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचाराचा आरोप असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला होता. तसेच "जर शरद पवार यांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मतदान करा", असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच थेटपणे राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT