Medha Kulkarni - Roopali Chakankar
Medha Kulkarni - Roopali Chakankar 
पुणे

मेधा कुलकर्णींना कोथरुडमधून पराभूत करु - रुपाली चाकणकर

ज्ञानेश सावंत

पुणे : सामाजिक असमानतेचा मुद्दा पटवून देताना 'बारामतीकर' असा उल्लेख करीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सोडणाऱ्या भाजप आमदार मेधा कुलकर्णींना आता राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी लक्ष्य केले आहे. 'शिस्त आणि वैचारिकतेची मिजास मिरवणाऱ्या संघाच्या मुशीत वाढूनही कुलकर्णी हल्ली नेहमीच जातीयवादावर का बोलत आहेत,' असा खोचक प्रश्‍न पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला. 

"अशा बोलण्याचे परिणाम कुलकर्णींना भोगावे लागणार असून, आगामी निवडणुकीत त्यांना कोथरुडमधून पराभूत करू,'' असे इशारे वजा आव्हानही चाकणकरांनी दिले आहे. त्यामुळे कुलकर्णी-चाकणकर यांच्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना कुलकर्णी यांनी सामाजातील असमानतेवर भाष्य केले. "सध्या समाजात असमानता निर्माण केली जात असल्याचे सांगून, कुलकर्णी यांनी पवार यांच्या कडे बोट दाखविले होते. त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, या पक्षाच्या महिला नेत्या आपापल्या पध्दतीने कुलकर्णी यांनी केलेली टीका खोडून काढत आहेत. 

राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही कुलकर्णी यांचा नुकताच खरपूस समाचार घेतला. ''फुले-शाहू-आंबेडकर झिजले नसते तर, मेधा कुलकर्णींना आजघडीला घरी भाकरी थापाव्या लागल्या असत्या,'' अशा शब्दांत वाघ यांनी पवारांवरील टीकेचा वचपा काढला. त्यापाठोपाठ चाकणकर यांनीही 'सोशल मीडिया'तून कुलकर्णी यांच्यावर बोचरी टीका केली. 

चाकणकर म्हणाल्या, "जातीयवाद निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मेधा कुलकर्णी आपला अजेंडा राबवित आहेत. त्या सातत्याने जाती-धर्मावरून बोलत आहेत. ज्यामुळे निवडणूक जिंकता येईल, अशी आशा त्यांना असावी. पण, अशा पध्दतीने तेढ निर्माण करणे कुलकर्णी यांना परवडणारे नाही. जातीचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या कुलकर्णींना कोथरुडमधून हरवू. त्यासाठी मतदार एकत्र येतील.'' दरम्यान, राष्टवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी पुण्यात आयोजित केलेल्या संविधान बचाव मोहिमेत कुलकर्णी यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात येणार आहे, असेही चाकणकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT