eknath shinde chandrakant patil sharad pawar sarkarnama
पुणे

Chandrakant Patil : CM शिंदेंच्या वाढदिवसाला केलेली घोषणा चंद्रकांतदादा विसरले? पवारसाहेबांच्या शिलेदारानं करून दिली आठवण

Sudesh Mitkar

Pune News : सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक 'शब्द' म्हणजे सरकारचे 'धोरण' असे मानले जाते. सरकारवर असलेला हा जनतेचा विश्वास भारताच्या व महाराष्ट्राच्या यशस्वी वाटचालीचा पाया आहे.

सध्या मात्र केंद्र व राज्य दोन्ही स्तरांवर सवंग घोषणाबाजीला पेव फुटले आहे. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणा करायची आणि निवडणुका पार पडताच केलेली घोषणा विसरून जायची हा प्रकार म्हणजे जनतेची फसवणूक आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पुण्यात आंदोलन केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 9 फेब्रुवारी रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भर सभेत घोषणा केली की 'दिनांक 1 जून 2024 पासून राज्यातील सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार.' राज्यातील तमाम जनतेने ही घोषणा ऐकली, भाजपच्या सर्व मंत्र्यांनी, आमदारांनी, आयटी सेलने सोशल मीडियावर स्वतःच्या पक्षाचे आभारही मानले. त्यानंतर लोकसभा निवडणूक आली, या निवडणुकीतही भाजपने मुलींना मोफत शिक्षण देतोय म्हणून गावोगावी प्रचार केला.

मात्र, निवडणूक संपताच भाजपला स्वतःच्या घोषणेचा विसर पडला. 1 जून पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू झाले. विद्यार्थिनींच्या मागे पैशांचा तगादा लागला. सरकारवर विश्वास ठेवून मोफत शिक्षण घेऊ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थिनी पैशांच्या विवंचनेने त्रस्त आहेत. यातच सत्ताधारी पक्ष मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करण्यात व्यस्त असल्याचे चित्र महाराष्ट्रात आहे," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप ( Prashant Jagtap ) यांनी केली.

सरकारच्या या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले. या आंदोलनात मंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांचा निषेध करण्यात आला तसेच. 'घोषणा मोठी झाली खोटी, कसे काय सरकार बरे हाय का जनतेला फसवलं खरं हाय का,' अशी घोषणा बाजी करण्यात आली.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT