Jayant Patil On Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Jayant Patil On Ajit Pawar : "आम्ही जनतेचे रंग घेऊन..."; गुलाबी रंगावरुन जयंत पाटलांचा अजितदादांना टोला

Jagdish Patil

Pune News, 09 August : अजित पवारांच्या 'जनसन्मान यात्रे'नंतर आता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा' सुरू झाली आहे. शरद पवार गटाच्या या यात्रेची पहिली सभा जुन्नरमध्ये झाली. या यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गुलाबी रंगाववरुन जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सध्या 'गुलाबी'मय झाले आहेत. त्यांच्या जॅकेटपासून ते जनसन्मान यात्रेत वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा रंग देखील गुलाबी ठेवण्यात आला आहे. याच रंगावरुन सध्या राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

अशातच आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याच रंगावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांना डिवचलं आहे. आम्ही जनतेचे रंग घेऊन निघालो आहे, जनतेच्या विश्वासातील रंग आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी अजितदादांना टोला लगावला. पाटील म्हणाले, "राज्यात रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही आजपासून शिवस्वराज्य यात्रा सुरु करत आहोत. महायुती सरकारने सुरु केलेला गोंधळ दाखवण्याच काम ही यात्रा करेल. आमची यात्रा संपूर्ण राज्यभरात जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला कौल दिला आहे. शिवाय लोकसभेनंतर आता अधिकच उत्साह दिसतोय. साधेपणाने आम्ही जनतेच्या मनाला भिडणार आहे. आम्ही जनतेचे रंग घेऊन निघालो आहे, आमचा रंग जनतेच्या मनातीलआणि विश्वासातील रंग असून त्यात विश्वास आहे. जनतेत समरुप होण्यासाठी आमची यात्रा असून आमच्या यात्रेला विशिष्ट रंग देण्याची गरज नाही," असं म्हणत त्यांनी अजितदादांना (Ajit Pawar) टोला लगावला.

दादांची यात्रा 'गुलाबी'मय

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. दिंडोरीमधून या यात्रेचा आरंभ झाला आहे. यात्रेत शासकीय वाहनांसह इतर 200 हून अधिक वाहनांचा ताफा आहे. या ताफ्यातील गुलाबी रंगाची वाहने चर्चेचा विषय ठरत आहेत.

महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा गुलाबी रंग वाहनांसाठी वापरण्यात आल्याचं पवार गटाकडून सांगण्यात आलं आहे. यात्रेत सहभागी होणारे मंत्री, पदाधिकाऱ्यांसाठी दोन-तीन व्हॅनिटी वाहने गुलाबी रंगाचे आहेत. यासह अनेक छोटी वाहने देखील गुलाबी आहे, या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची प्रसिध्दी देखील करण्यात येत आहे.

ही वाहने सभास्थळी, सार्वजनिक ठिकाणी फिरविण्यात येणार आहेत. त्याद्वारे सरकारी योजनांची माहिती देण्याचे नियोजन आहे. मात्र, अजितदादांच्या जॅकेटपासून आता यात्रेची बसदेखील गुलाबीच असल्याने दादा 'गुलाबी'मय झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT