Jayant Patil  Sarkarnama
पुणे

Jayant Patil Statement: पुणे लोकसभेबाबत राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचं सूचक विधान; म्हणाले,''...अंतिम निर्णय घेऊ!''

Pune Lok Sabha Election : ''महाविकास आघाडीत पुणे लोकसभेची चर्चा तर होणारच...''

सरकारनामा ब्यूरो

ब्रिजमोहन पाटील

Pune : पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद ही कॉंग्रेसपेक्षा जास्त आहे. कोणाचे आमदार जास्त आहेत याचा विचार पुणे लोकसभेच्या जागेबाबत निर्णय घेताना विचार केला पाहिजे असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहेत. तर पुण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसनं घेतली आहे. याचदरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे लोकसभेबाबत सूचक विधान केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी शिरूर, जालना आणि भिवंडी या तीन मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरही थेट भाष्य केलं. पाटील म्हणाले,पुणे लोकसभेची चर्चा तर होणारच आहे. स्थानिक परिस्थिती बदललेली असते, तिथले नगरसेवक, लोकप्रतिनिधी बदललेले असता, प्रत्येक मतदारसंघात स्थिती बदललेली असताना या तपशीलात पक्षांतर्गत चर्चा केली जाईल. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असं सूचक विधान पाटील यांनी केलं आहे.

पुण्यावर चर्चा तर होणारच...

पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी(NCP)ला सोडण्याबाबत तडजोड होऊच शकत नाही असा निर्णय काँग्रेसच्या बैठकीमध्ये झालेला असताना आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र पुण्यावर चर्चा तर होणारच अशी भूमिका घेतली आहे. त्यातच आज पुणे लोकसभेतील बूथ बांधणी मजबूत करण्यासाठी आमदार चेतन तुपे यांच्याकडे पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.

अद्याप कोणत्याही पक्षाने कोणालाही मतदारसंघाची मागणी केलेली नाही. पक्षांतर्गत चर्चा केली म्हणजे मागणी केली असे होत नाही. तिन्ही पक्षात चर्चा केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये चर्चा करून जागा वाटपाचा निर्णय घेऊ.

'या' आमदारांकडे लोकसभेची जबाबदारी...

पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी तीन आमदारांकडे देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये पुणे लोकसभेतील सहा, बारामतीतील खडकवासला आणि शिरूरमधील हडपसर अशा आठ मतदारसंघाची जबाबदारी चेतन तुपे यांच्याकडे दिली आहे.

सुनील शेळके(Sunil Shelke) यांच्याकडे मावळमधील मावळ, पिंपरी, चिंचवड आणि शिरूरमधील भोसरी, जुन्नर, आंबेगाव, खेड असा एकूण सात सात मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. तर अशोक पवार यांच्याकडे शिरूरमधील शिरूर हवेली, बारामतीमधील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर या सहा मतदारसंघातील बूथ बांधणीची जबाबदारी दिली आहे.

सांगली लोकसभेसाठी तुमचे व प्रतीक पाटील यांच्या नावाच्या चर्चांवरही भाष्य केलं. पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एक वर्ष आहे. उत्साही कार्यकर्ते वेगवेगळ्या नेत्यांची नावे सुचवितात, शेवटी अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT