Ghodganga Sugar factory election-Ashok Pawar &NCP Panel
Ghodganga Sugar factory election-Ashok Pawar &NCP Panel Sarkarnama
पुणे

पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पॅनेलने सरासरी दीड हजाराच्या फरकाने ‘घोडगंगा’चे मैदान मारले!

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : शिरूर (Shirur) तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) मतमोजणीची अधिकृत आकडेवारी जाहिर झाल्यानंतर, आमदार ॲड. अशोक पवार (Ashok Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) पॅनेलने सरासरी दीड हजाराच्या मताधिक्क्याने ही निवडणूक जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतः पवार यांना मात्र त्यांच्या वडगाव रासाई गटाने तब्बल अडीच हजारांचे मताधिक्क्य दिले. विरोधी पॅनेलने कडवे आव्हान उभे केले होते. प्रत्यक्षात विजेत्या शेतकरी विकास पॅनेलच्या तुलनेत त्यांना मिळालेल्या मतांमधील दरी मोठी असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. (NCP's panel wins Ghodganga factory election with an average margin of 1500 votes)

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शेतकरी विकास पॅनेलला न्हावरे गटाने सर्वाधिक सहा हजारांचे मताधिक्क्य दिले, तर मांडवगणमध्ये सर्वात कमी अकराशेचे मताधिक्क्य मिळाले. शिवाय भाजपसह विरोधी पक्षांच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे दादा पाटील फराटे हे एकमेव उमेदवार या गटातून २३५ मतांनी निवडून आले. शिरूर गटाने राष्ट्रवादीला चार हजार ६७६ चे, तर वडगाव गटाने साडेचार हजाराचे मताधिक्क्य दिले. त्याखालोखाल तळेगाव ढमढेरे गटातून चार हजार व इनामगाव गटातून साडेतीन हजाराचे मताधिक्क्य मिळाले. राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून आमदार पवार यांना सर्वाधिक आठ हजार १८७, तर तळेगाव ढमढेरे गटातील पोपट भुजबळ यांना सर्वात कमी सात हजार १३७ मते मिळाली.

आमदार ॲड. अशोक पवार यांनी सन १९९७ पासून झालेल्या कारखान्याच्या सर्व निवडणुकांत वर्चस्व राखले असून, मताधिक्क्य वेळोवेळी वाढवत नेल्याचेही कालच्या निकालातून दिसून आले आहे. यापूर्वीचा एक अपवाद वगळता सर्वाधिक मते मिळविण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर असून, विरोधी पॅनेलचे प्रमुख उमेदवार दादा पाटील फराटे यांना निसटत्या मतांनी विजय मिळवता आला आहे.

या निवडणूकीत आमदार पवार व फराटे यांच्यासह पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रभाकर नारायण तथा आबासाहेब पाचुंदकर व वाल्मिकराव कुरंदळे हे प्रमुख उमेदवार विजयी झाले तर कॉंग्रेसचे जुने कार्यकर्ते आबासाहेब गव्हाणे, जिल्हा कॉंग्रेसचे खजिनदार महेशबापू ढमढेरे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंगअण्णा थोरात व ॲड. सुरेश पलांडे हे प्रमुख उमेदवार पराभूत झाले.

कमी मताधिक्क्य मिळालेल्या मतदार संघातील पराभूत उमेदवारांनी मतमोजणीदरम्यान आक्षेप घेऊन पुनर्मतमोजणीची मागणी केल्याने तीन मतदार संघातून रिकाऊंटींग करण्यात आले. त्यामुळे रात्री साडेआठच्या सुमारास सर्व जागांचे अधिकृत निकाल जाहिर करण्यात आले.

घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते : संभाजी फराटे (७१९१), दादा पाटील फराटे (६९३८), सचिन मचाले (७७८१), नरेंद्र माने (७४६५), ॲड. अशोक पवार (८१८७), उमेश साठे (७४२४), संजय काळे (७८२८), शरद निंबाळकर (७७३३), मानसिंग कोरेकर (७६४०), सोपान गवारी (७६८७), विश्वास ढमढेरे (७३६३), पोपट भुजबळ (७१३७), वाल्मिकराव कुरंदळे (७६२०), सुहास थोरात (७४१९), आबासाहेब पाचुंदकर (७३७९), उत्तम सोनवणे (७६१४), मंगल कोंडे (७६४५), वैशाली जगताप (७५५१), शिवाजी गदादे (७४२६), बिरा शेंडगे (७२०१). पराभुत उमेदवार व त्यांना मिळालेली मते ः दिलीप फराटे (६८०६), बाळासाहेब फराटे (५८७२), तात्यासाहेब घाडगे (५९४६), मच्छिंद्र थोरात (५७६३), वीरेंद्र शेलार (५७५२), सुभाष शेलार (५४२५), अशोक गारगोटे (५७७६), पांडुरंग दुर्गे (५७९६), दत्तू शेंडगे (५२२७), आबासाहेब गव्हाणे (६१४६), महेश ढमढेरे (६१०६), ॲड. सुरेश पलांडे (५९०५), पांडुरंग थोरात (६१६५), सावित्रा थोरात (५९५५), अशोक माशेरे (५६२२), शांताराम कांबळे (५६३२), मंदाकिनी नागवडे (६०२४), सुवर्णा फराटे (५९२९), राहुल गवारे (६२२०), बाळू कोळपे (५९८४).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT