Jayant Patil Sarkarnama
पुणे

Jayant Patil on Loksabha : लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; बारामतीत ताई, जळगाव अन् साताऱ्याबाबत जयंत पाटलांचं मोठं भाष्य

Ganesh Thombare

Pune News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना जोरदार वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता, त्यांनी लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणी केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) देखील लोकसभा उमेदवारांची चाचपणी केली आहे.

"लोकसभेसह विधानसभेसाठीही आमची जुळवाजुळव सुरू आहे", असे मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. रविवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना पाटलांनी ही माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिली जाणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतात. आता यावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी माझ्या पक्षाच्या उमेदवाराबद्दल सांगू शकतो. राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे या उमेदवार असतील", असं पाटील म्हणाले.

"आमची लोकसभेसाठीची नावे जवळपास निश्चित झाले असून, जळगावची जबाबदारी आम्ही एकनाथ खडसे यांच्यावर सोडलेली आहे. बारामतीत सुप्रिया सुळे या उमेदवार आहेतच. तर साताऱ्यासाठी थोड्या दिवसांत उमेदवार निश्चत होईल. आम्ही फक्त लोकसभा नाही, तर विधानसभेपर्यंत जुळवाजुळव करत आलो आहोत", अशी माहिती पाटलांनी दिली.

रोहित पवारांच्या 'त्या' बॅनरवर पाटलांचं भाष्य

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. या बॅनरची राज्यात मोठी चर्चाही झाली. यावर पाटील म्हणाले, "लोकशाहीत कुणीही बॅनर लावू शकतं. समर्थक कुणाला कुठेही नेऊन बसवतात. त्यामुळे त्यावर काही ऑब्जेक्शन घेण्याचे कारण नाही. शरद पवारांकडे मुख्यमंत्री व्हावे असे अनेक नेते आहेत", असं पाटलांनी सांगितलं.

'अजितदादांची राष्ट्रवादी अस्तित्वात नाही'

राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) पुण्यात गणपती मंडळांना भेटी देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जयंत पाटील पुण्यात आले होते. या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना कोणत्या राष्ट्रवादीला बाप्पाने आशीर्वाद द्यावा, असं तुम्हाला वाटतं ? असा प्रश्न विचारला.

या प्रश्नावर जयंत पाटलांनी खास आपल्या शैलीत उत्तर दिलं. "आज एकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात असून, ती राष्ट्रवादी शरद पवारांच्या नेतृत्वातील आहे. दुसरी राष्ट्रवादी (अजित पवार गट) अजून अस्तित्वात आलेली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT