Arun Gire-Vishnu Hinge, Katraj Dairy election News
Arun Gire-Vishnu Hinge, Katraj Dairy election News Sarkarnama
पुणे

कात्रज डेअरी : गृहमंत्र्यांच्या आंबेगावात राष्ट्रवादीची मते फुटली

सरकारनामा ब्यूरो

डी. के. वळसे पाटील/सुदाम बिडकर

मंचर (जि. पुणे) : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी, Katraj Dairy) पंचवार्षिक निवडणुकीत आंबेगाव तालुक्यातील ‘अ’ वर्ग संचालकपदासाठी झालेल्या निवडणुकीत संघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (ncp) तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे हे विजयी झाले. त्यांना ३५ मते मिळाली. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरुण गिरे हे दोन्ही मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यांना अ वर्गात १२ मते, तर इतर मागास प्रवर्गातून तब्बल २२ मते मिळाली आहेत. गिरे यांना मिळालेली मते पाहता दक्षता घेऊन खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या आंबेगाव तालुक्यातच राष्ट्रवादीची मते फुटल्याचे दिसून येत आहे. (NCP's votes split in Home Minister Dilip Walse Patil's Ambegaon)

आंबेगाव तालुका सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गृहमंत्री वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथे सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आहे. विष्णू हिंगे गेली ३२ वर्ष दूध संघावर संचालक आहेत. संघाच्या अध्यक्षपदी काम करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. हिंगे यांनी या निवडणुकीची जय्यत तयारी केली होती. मतदारांमध्ये बहुसंख्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. हिंगे यांचा विजय निश्चित होता. तालुक्यातील ४७ पैकी ४० ते ४२ मते हिंगे यांना मिळतील, असा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अंदाज होता. पण हिंगे यांना ३५, तर गिरे यांना १२ मते मिळाली. इतर मागासवर्ग मतदार संघातही आंबेगाव तालुक्यातून शिवसेनेचे अरुण गिरे यांना २२, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भाऊ देवाडे यांना २४ मते मिळाली आहेत. (Katraj Dairy election News)

आंबेगाव तालुक्यातील अ गटावर मजबूत पकड असतानाही राष्ट्रवादीने नियोजनाच्या बैठका घेतल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रचारही राबवला जात होता. मतदानाच्या एक दिवस अगोदर राष्ट्रवादीने काही मतदारांना लोणावळ्यासारख्या थंड हवेच्या ठिकाणी सहलीला नेले होते. त्या ठिकाणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मतदार व कार्यकर्त्यांना एकत्रित मार्गदर्शन केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. त्यामानाने शिवसेनेच्या गोटात मतदानाच्या दिवसापर्यंत शांतता होती, त्यामुळेच गिरे यांना पडलेल्या मतांची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांचा शोध घेण्याची मोहीम राबविण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

या कारणांमुळे गिरेंना अधिक मते मिळाल्याची चर्चा

अ वर्गातून गिरे यांना १२ मते पडली, तर इतर मागास प्रवर्गात २२ मते पडली, यावरून अरुण गिरे यांचे म्हणणे आहे की, अ वर्गातही मला चांगली मते पडायला हवी होती. पण, अपेक्षेपेक्षा कमी मते पडली असल्याचे त्यांनी सांगितले. गिरे पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते, त्यामुळे त्यांचे आजही अनेकांशी मैत्रीचे संबंध आहेत, त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक संपर्कामुळे इतर मागास प्रवर्गात त्यांना आंबेगावातून अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झाले असावे, अशीही चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादीतील काहींनी गद्दारी केली : हिंगे

विरोधकांची तीन मते होती, त्यांना सूचकही मिळत नव्हता. तालुक्यातील ४५ मते राष्ट्रवादी कॉंग्रेसला मानणारी होती. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसमधीलच काहींनी गद्दारी केली आहे. सहा ते सात मते फुटली आहेत. याबाबतचा अहवाल गृहमंत्री वळसे पाटील यांना देणार आहे. मतदान केलेल्या सर्वांचा मी आभारी आहे, असे नवनिर्वाचित संचालक विष्णू हिंगे यांनी विजयानंतर सांगितले.

प्रस्थापितांच्या विरोधात मला मतदान झाले : गिरे

शिवसेना पक्ष व माझ्या व्यक्तिगत संबंधामुळे मला अपेक्षित मतदान मिळाले आहे. जिल्ह्यातून व आंबेगाव तालुक्यातून दोन ठिकाणी उभा होतो. मतदारांनी प्रस्थापितांच्या विरोधात मला मतदान केले आहे. मतदारांचा मी आभारी आहे, असे शिवसेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख तथा पराभूत उमेदवार अरुण गिरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT