Shivajirao Adhalrao patil
Shivajirao Adhalrao patil Sarkarnama
पुणे

शिवसेनेत माझी काय किंमत, हे आता मला कळलं : हकालपट्टीच्या बातमीने आढळराव व्यथित

सरकारनामा ब्यूरो

पुणे :गेल्या १८ वर्षांपासून शिवसेना (shivsena) टिकविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत (ncp) संघर्ष केला आणि अजूनही करत आहे. कुटुंब, व्यवसाय सोडून पक्षनिष्ठेने काम करतोय, तरीही पक्षाने केलेली हकालपट्टी माझ्या जिव्हारी लागली आहे. या हकालपट्टीने माझी जी बदनामी झाली, ती कधीच भरुन निघणारी नाही. आता मी अस्वस्थ झालोय. पक्षाने हकालपट्टी मागे घेत हे चुकीने घडल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, पक्षात माझी काय किंमत आहे, हे आता मला कळलंय. मी सध्या तरी शिवसेना सोडणार नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष कायम राहील, असं सूचक वक्तव्य माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao patil) यांनी केले. (Now I know what my value is in Shiv Sena : shivajirao Adhalrao patil)

माजी खासदार आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर तातडीने ती मागे घेत आढळराव हे शिवसेना उपनेतेपदी कायम असतील, असे स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आले. त्यानंतर शिवाजी आढळराव पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले की,आज सकाळपासून अनेकांचे फोन आले. सामना पेपर आणि न्यूज चॅनेलवर बातम्या पाहिल्या, त्या खऱ्या आहेत का? मला आधी वाटलं कोणीतरी माझी चेष्टा करतंय. मात्र, मी स्वतः सामना पेपर वाचला आणि मला धक्का बसला. यावर नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची, हेच समजत नव्हतं. काल रात्रीच माझं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं. त्यावेळी फेसबुक पोस्टबद्दल विचारलं. ती खूप व्हायरल झाली. यावर मी स्पष्टपणे सांगितलं की, ती पोस्ट टाकून काही चूक केली, असं अजिबात वाटत नाही.

आढळराव म्हणाले की, नेमकं काय चाललंय हे कळेना. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापलंय. त्यात अनेकांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. मग माझ्या एकट्यावर हकालपट्टीची कारवाई का? गेल्या १८ वर्षांपासून बाळासाहेब ठाकरेंसाठी एकनिष्ठ राहिलो. तरी मला अशी वागणूक दिली जातीये. कोणीही सांगावं मी कोणती पक्षविरोधी कारवाई केली. माझी झालेली हकालपट्टी ऐकून मी खूप दुःखी झालोय. आता हकालपट्टी केली नाही, असं पत्र पाठवलं आहे. पण काय फायदा. झालं त्याचं मला वाईट वाटतंय. १८ वर्ष निष्टेने काम केली, त्याचं हे फळ मिळालं. पक्षात आज माझी काय किंमत आहे हे मला समजलं. राष्ट्रवादी काँग्रेसला मी अंगावर घेतलं हीच माझी चुक दिसतीये. त्याची ही शिक्षा असेल तर मला मान्य आहे. पण तरीही मी आजही पक्षाविरोधात नाही. बघू पुढं काय होतंय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT