Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwad  Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad : देशातील सिटी सेंटर सोडून पिंपरी पालिका आयुक्त निघाले दुबईचे सेंटर पहायला

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता असेपर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात (२०१७ ते २०२२) देश, विदेशच्या `अभ्सास` सहली केल्या. पण, पालिकेची मुदत संपून प्रशासकीय कारभार सुरु झाल्याने आता काही महिन्यांपूर्वीच पिंपरीत आय़ुक्त म्हणून आलेले आणि सध्या प्रशासक असलेले शेखरसिंह हे स्वत:च तीन अधिकाऱ्यांसह दुबई दौऱ्यावर चालले आहेत. मात्र, त्याबाबत खूप गुप्तता पाळली गेली आहे.

आयुक्त, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम आणि कार्यकारी अभियंता तथा प्रवक्ते स्थापत्य शिरिष पोरेड्डी हे उद्या पाच दिवसांकरिता दुबईला चालले आहेत. या दौऱ्यावर काही लाख रुपये खर्च होऊ घातला आहे. दुबईतील सिटी सेंटरची पाहणी व अभ्यास करण्यासाठी ते चालले आहेत. कारण तसे सेंटर उद्योगनगरीतही उभारले जाणार आहे.

मात्र, भारतात दिल्ली व महाराष्ट्रात मुंबईतही अशी सेंटर उभारण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांची पाहणी करण्याऐवजी दुबईच्याच अशा सेंटरची पाहणी का? असा प्रश्न काही चिकित्सक शहरवासीयांना पडला आहे. त्यामुळे त्यांचा हा परदेश दौरा आतापर्यंत काही कोटी रुपये खर्ची पडलेल्या पालिका पदाधिकाऱ्यांच्या टूरसारखाच (सहली) होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

कारण पालिका पदाधिकारी व नगरसेवकांच्या या दौऱ्यांतून आतापर्यंत काहीच हाती लागलेले नाही. त्यांचा परिणामकारक रिझल्ट मिळालेला नाही. त्यामुळे जनतेच्या पैशाची नाहक उधळपट्टी करणारे हे दौरे वादग्रस्तच ठरलेले आहेत. देशात स्वच्छ शहर स्पर्धेत अग्रक्रम टिकवणाऱ्या मध्यप्रदेशातील लाखो रुपये खर्च झालेला इंदूरचा दौरा भाजप पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा गत टर्ममधील शेवटचा दौराही असाच शाबीत झाला. कारण त्यातूनही पिंपरी-चिंचवडकरांच्या हाती विशेष असे काही लागले नाही.

पिंपरी पालिकेची मुदत गेल्यावर्षी 13 मार्चला संपली. त्यामुळे आतापर्यंत पालिकेचे अभ्यास दौरे बंद होते. ते आता पुन्हा सुरु झाले आहेत. पण, ते पदाधिकाऱ्यांचे नाही, तर अधिकाऱ्यांचे आहेत. पालिकेस उत्पन्नाचा एक स्त्रोत म्हणून `पीपीपी` तत्वावर पिंपरी पालिका सिटी सेंटर बांधणार आहे. त्यात कार्यालये, हॉटेल, करमणूक केंद्र, व्यापारी गाळे, बहुउद्देशीय हॉल, वाहनतळ आदी सुविधा असणार आहेत.

नवी दिल्लीतील हेबिहाट सेंटर, मुंबईतील (मालाड) माइन्स स्पेस आणि बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्‍स, हुस्टन सिटी अमेरिका, आणि दुबईच्या धर्तीवर ते उभारले जाणार आहे. त्यासाठी निव्वळ सल्लागाराला दोन कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. दरम्यान, आपल्या अनुपस्थितीत शेखरसिंह हे आयुक्त तथा प्रशासक पदाचा कार्यभार मर्जीतील अतिरिक्त आयुक्त (1) प्रदीप जांभळे-पाटील यांच्याकडे सोपविण्याची शक्यता आहे. कारण, यापूर्वीही त्यांनी तो त्यांच्याकडेच दिलेला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT