Chhagan Bhujabal
Chhagan Bhujabal Sarkarnama
पुणे

भुजबळांच्या विधानावर 'पानिपत'कार भडकले अन् म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी 'सरस्वती' बाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा आहे. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची? असे विधान भुजबळांनी केले होते. याच वक्तव्याला पानिपतकार विश्वास पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिले. "अलीकडे राजकारणी लक्ष्मीच्या प्रेमात असतात, म्हणून त्यांना सरस्वती आवडत नाही, असा जबरदस्त टोला पाटील यांनी भुजबळांना लगावला.

यावेळी पाटील म्हणाले, "यांना सरस्वतीचे महत्त्व माहितीच नाही. राजकीय लोकांना इतिहास भूगोल देखील माहित नाही. शाळेत पहिल्यांदा सरस्वतीची पूजा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तुम्हाला माहिती नसेल पण सावित्रीबाई फुले यांनी देखील सरस्वतीची उपासना केली होती. त्यांच्या शाळेची सुरुवात सरस्वती देवीच्या पूजनाने होत असे. त्यावेळी महात्मा फुले तेथे उभे असत." अभिनेते प्रसाद ओक यांच्या 'आनंद' या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

पाटील यांनी सावित्रीबाई फुले लिखित काव्य फुले या पुस्तकाचा दाखलाही दिला. ''सावित्रीबाई फुले यांच्या काव्यफुले या कवितासंग्रहात ३१ व्या पानावर सरस्वती देवीच्या स्तुतीची कविता आहे. या कवितेत 'सरस्वतीच्या दरबारात शिक्षण घेणेस जाऊ चला, विद्यादेवीस प्रसन्न करूनी वर मागू चला', अशा ओळी आहेत. हे आपल्याला माहित नाही. इतकी बौद्धिक पातळी खाली आली आहे.

माणसे गरीब असतात, कारण त्यांच्याकडे लक्ष्मी नसते. गरीब माणसांना आधार विद्येचा व कलेचा असतो, म्हणजेच सरस्वतीचा असतो. त्यामुळे सरस्वतीचा अपमान हा या देशातील गरीबीचा अपमान आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजच्या भाषेत बोलायचे झाले, तर लक्ष्मी खोके आहे आणि सरस्वती डोके आहे," असे परखडपणे पाटील यांनी म्हंटले.

सरस्वती ही फक्त हिंदूची देवता नाही. बौद्ध धर्मियांमध्ये मंजुश्री, जैन धर्मियांमध्ये वागेश्वरी नावाने तिची पूजा केली जाते. सिलोन, जपान, जकार्तामध्ये तिची पूजा होते. भारतीय संस्कृतीचा जयघोष केवळ जनसंघाने केला नाही तर समाजवाद्यांनी केला आहे. भारतीय संस्कृती हिमालयासारखी आहे. ती सर्वधर्मीयांची आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT