Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Maharashtra Politics : महायुतीत विधानसभा निवडणुकीची तयारी; आता मंत्रिमंडळ विस्तार? 'या' नेत्यांना संधी

गणेश कोरे

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीने विधानपरिषदेत आपली एकजूट दाखवून दिली. विधान परिषदेत सर्वच्या सर्व 9 उमेवार निवडून आणल्यानंतर महायुतीत आता विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरूवात झालेली आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. त्यात ओबीसी नेत्या आमदार पंकजा मुंडे यांच्यासह पुण्यातील अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके आणि सुनील शेळके यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेची रणनीती यशस्वी केल्यानंतर महायुतीकडून विधानसभा निवडणुकीचे प्लॅनिंग सुरू केले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची हालचाल सुरू झाल्याची माहिती आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात महायुती लोकसभेत पराभव झालेल्या मतदारसंघाना प्राधान्य देण्याबाबत सध्या विचाराधीन आहे. त्यातून प्रामुख्याने मराठवाडा, पश्‍चिम महाराष्‍ट्र आणि विदर्भाला मंत्रिमंडळात संधी देण्याची शक्यता आहे.

लोकसभेत बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांचा पराभव झाला. आता त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. लोकसभेत महायुतीला मोठा फटका बसला आहे. ते डॅमेज भरून काढण्यासाठी विधानसभेला पंकजा मुंडेंना संधी मिळण्याची शक्यत आहे. विधानसभसेत मराठवाड्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी महायुतीकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. मुंडेंच्या मंत्रिडळातील स्थानामुळे वंजारी समाज पुन्हा एकदा भाजपकडे वळणार आहे.

पुण्यातून बेनके की शेळके?

पुणे जिल्ह्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र लोकसभेत हक्काच्या बारामती आणि शिरूरमधील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. आता डॅमेज कंट्रोल करण्याठी अजित पवार गटाकडून जुन्नरचे आमदार अतुल बेनके किंवा मावळचे सुनील शेळके यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तवली जात आहे.

आता पुण्याला संधी नाही

पुणे लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच खासदार आणि केंद्रिय मंत्री झाले आहेत. शहरातील कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्री आहेत. यामुळे आता पुणे शहरातून एकाही आमदाराला संधी मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यातील बळ टिकवण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके किंवा यांना राष्ट्रवादी (अजित पवार) कडून राज्यमंत्री म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी स्पर्धा

राज्यात राज्यपाल नियुक्त आमदारपदे भरण्यासाठी महायुती हालचाल करण्याची शक्यता आहे. त्यासाठी महायुतीत मोठी स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपातील तिढा सोडवण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांचे प्रत्येकी ३ जणांना राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची संधी आहे. यामध्ये कोणाची वर्णी लागते याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT