patole.png
patole.png 
पुणे

पटोलेंचे स्वत:च्याच सरकारवर फोन टॅपिंगचे आरोप 

सरकारनामा ब्यूरो

पुणे : फडणवीस सरकारवर फोन टॅपिंगचे आरोप करणाऱ्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता त्यांच्या स्वत:च्या सरकारवरदेखील फोन टॅपिंगचे आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना माहिती देण्यासाठी फोन टॅपिंग करण्यात येत असून एक प्रकारे माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.(Patole accuses his own government of phone tapping)

फोन टॅप होत असल्याची माहिती कशी मिळाली किंवा कोण हे काम करीत आहे. याबाबत पटोले यांनी कोणताही तपशीला सांगितलेला नाही. मात्र, सरकारकडून फोन टॅप होत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे आयोजित पक्षाच्या मेळाव्यात बोलताना पटोले यांनी हा आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘‘ कॉंग्रेस वाढविण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. जुने कार्यकर्ते जोडत आहे. पक्ष वाढविण्यासाठी काम करीत राहणे माझे कर्तव्य आहे. आपल्या पक्षाचा विस्तार करणे त्यासाठी झटणे प्रत्येकाचे काम आहे. ते मी करीत असताना मी कुठे जातो यावर पाळत ठेवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना माहिती दिली जात आहे.’’

 पुणे जिल्ह्यात यापुढे मी विशेष लक्ष देणार असल्याचे सांगत एकप्रकारे पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिल्याचे मानले आहे. गेले सलग दोन दिवस पटोले यांनी पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटना बांधणीला सुरवात केली आहे. या पाश्‍र्वभूमीवर पटोले यांच्या या वक्तव्याने आघाडील तीन्ही घटक पक्षात खळबळ उडाली आहे. पटोले म्हणाले, ‘‘  मुख्यमंत्री ठाकरे त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना कामाला लागा असे सांगतात त्याची कसलीच चर्चा होत नाही. मात्र, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामाला लागा असे मी सांगितले तर त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. वास्तविक प्रत्येकाला आपल्या पक्षाचा अधिकाधिक विस्तार करण्याचे स्वातंत्र्य आहे.त्यामुळे माझे काम मी करीत असताना त्यात इतरांनी हस्तक्षेप किंवा त्यावर विशिष्ट भूमिका घेत टीका करण्याचे कारण नाही.’’  

पटोले यांनी स्वत:च्याच सरकारवर फोन टॅपिंगचे आरोप केल्याने राज्य सरकारची पंचाईत झाली असून या या संदर्भात राज्य सरकारला खुलासा करावा लागणार आहे. आपल्याबद्दलची माहिती थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना दिली जात असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले आहे.   Edited By : Umesh Ghongade
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT