Maya Barne
Maya Barne sarkarnama
पुणे

भाजपचा आणखी एक नगरसेवक राजीनामा देणार ; १५ दिवसांत चौथा धक्का

उत्तम कुटे: सरकारनामा ब्युरो

पिंपरी : महापालिका निवडणूक जवळ आल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये (pcmc)राजीनामा सत्र सुरु झाले आहे. पण, ते भाजपमधूनच (bjp)फक्त येत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये, मात्र प्रवेश सुरु आहेत. थोड्या वेळातच शहर कारभारी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड मतदारसंघातून आणखी एक नगरसेविका नगरसेवकपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनी स्वत:च त्याला पुष्टी दिली आहे. गेल्या १२ दिवसांत चिंचवडमधील तिसऱ्या,तर पंधरवड्यात शहरातील हा चौथ्या भाजपच्या नगरसेवकाचा राजीनामा असणार आहे.

दरम्यान,आजचेच नाही, अगोदर राजीनामा दिलेले भाजपचे दोघे व देणारे आणखी काही नगरसेवक अशांचा सामूहिक राष्ट्रवादी प्रवेश १३ तारखेच्या आसपास होण्याची दाट शक्यता आहे. त्याला राष्ट्रवादीतील जबाबदार पदाधिकाऱ्याने आज 'सरकारनामा'शी बोलताना दुजोरा दिला. त्यामुळे विधीमंडळाच्या अधिवेशनात अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजपने महाविकास आघाडी व त्यातही राष्ट्रवादीला घेरले असताना पिंपरीत,मात्र अजितदादा भाजपला जोर का धक्का...देण्याच्या तयारीत आहेत. १३ मार्चलाच पिंपरी पालिकेची मुदत संपत आहे.

माया बारणे (प्रभाग क्र.२४ क) (Maya Barne)असे थोड्या वेळातच राजीनामा देणार असलेल्या नगरसेविकेचे नाव आहे. त्यांचे पती व माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी अगोदरच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे.त्यामुळे राजीनाम्यानंतर नगरसेविका बारणे या सुद्धा राष्ट्रवादीतच प्रवेश करण्याची शक्यता आहे. आयुक्तांची वेळ पाहून राजीनामा देणार असल्याचे त्यांनी थोड्या वेळापूर्वी सरकारनामा प्रतिनिधीला सांगितले.मात्र,राष्ट्रवादीत प्रवेश करणार का,यावर त्यांनी थेट भाष्य करणे लगेच टाळले.

गेल्या पाच वर्षात कुठलेही महत्वाचे पद न मिळाल्याने त्या नाराज होत्या.त्यातून गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी भाजपच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे थांबवले होते. त्यातूनच त्या पक्ष सोडणार असल्याचे संकेत मिळाले होते. अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.नुकतीच त्यांनी पत्रकारपरिषद घेत पालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचाराचे एक प्रकरण बाहेर काढले होते.

संतोष बारणे व राजू लोखंडे या माजी नगरसेवकांनी भाजप कमळ सोडून हातावर घड्याळ बांधले.त्यांच्या नगरसेविका पत्नी त्यांचा कित्ता आता गिरवणार आहेत. कारण, चिंचवडमधील भाजपच्या नगरसेविका चंदा लोखंडे यांनी गेल्या महिन्यात २१ तारखेला,तर याच मतदारसंघातील याच पक्षाने दुसरे नगरसेवक तुषार कामठे यांनी त्यानंतर तीन दिवसांत २४ तारखेला नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. हे दोघे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.त्यांच्याअगोदर नगरसेवकपदाच्या राजीनाम्याची सुरवात शहराचे दुसरे कारभारी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या मतदारसंघातील वसंत बोराटे यांनी १६ फेब्रुवारीला केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT