पिंपरी : एका ठेकेदाराने गेल्या महिन्यात (ता. १८ ऑगस्ट) पिंपरी पालिकेला (PCMC)चांगलाच धडा शिकवला. ठेका रकमेच्या दोन टक्के लाच घेणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षांसह (Standing Committee Chairman) समितीच्या चार कर्मचाऱ्यांना या तरुण ठेकेदाराने जेलची (Jail) हवा खायला लावली. त्यानंतरही पालिकेने धडा घेतल्याचे दिसत नाही.
ठेकेदार पोसण्याचे आणि टक्केवारीचे दोन विषय आजच्या (ता.२९ सप्टेंबर ) स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यात, विद्यार्थी हित असल्याचे सांगून आपले हित साधून घेण्याचा प्रयत्न आहे. लाचखोरीनंतर स्थायीत प्रथमच थोडाफार विरोध करू लागलेले विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) चार सदस्य शिक्षण समितीच्या या तीन मलईदार विषयांवर काय भूमिका घेतात, हे बघावे लागणार आहे. तसेच, हे प्रस्ताव मंजूर होणार का? याकडे लक्ष लागले आहे.
शिक्षण समितीने या महिन्यात (ता.१६ सप्टेंबर) ठराव केलेला व आजच्या स्थायीसमोर ठेवलेला विषय उशीरा सुचलेले शहाणपणच आहे. कारण कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरलेली असून तिसरी लाट येण्याची शक्यताही मावळली आहे. आता ऑनलाईन शिक्षण थांबणार आहे. कारण ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु होणार आहेत. त्यानंतर पालिका शाळांतील शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण कसे द्यावे, त्याचे प्रशिक्षण देण्याचे शहाणपण पालिकेला सुचले आहे. त्यासाठी पहिल्या टप्यात पाचशे शिक्षकांना ते दिले जाणार आहे. त्यासाठी प्रती शिक्षक दोन हजार रुपये प्रशिक्षण शुल्कापोटी पालिका मोजणार आहे. तसेच, ही अत्यंत तातडीची आवश्यकता असल्याने निविदाप्रक्रिया न राबवता हे काम थेट पद्धतीने 'ग्लोबल एज्युकेशन अॅन्ड टेक्नॉलॉजी सोल्यूशन' या कंपनीला देण्याचा घाट घालण्यात आला आहे. दरम्यान, शाळा प्रत्यक्ष सुरु होणार असल्याने या ऑनलाईन तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाची शिक्षकांना आता तातडीची गरज राहिलेली नाही. तसेच ते आतापर्यंत गेली दीड वर्षे का दिले नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यार्थ्यांना पुस्तक देऊन अक्षर वळणदार करणार..
आजच्या स्थायीच्या अजेंड्यावरील दुसरा अजब प्रस्ताव हा शिक्षण समितीचाच आहे. तसेच तो यापूर्वी अनेकदा आलेला आहे. स्थगित करूनही पुन्हा मंजूरीसाठी रेटून तो ठेवण्यात आला आहे. पालिका शाळांचा दर्जा खासगी शाळांसारखा करून तेथील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आणि तेथील मुलांचे हस्ताक्षर सुंदर करण्याकरिता मुलांना `सुंदर माझे अक्षर` हे पुस्तक देणार आहे. विद्यार्थ्यांकडून लेखनाचा सराव करून घेऊन त्यांचे अक्षर वळणदार आणि सुंदर करण्याऐवजी नुसते सुंदर अक्षराचे पुस्तक देऊन ते सुंदर कसे होणार हा प्रश्न काही शिक्षकांनीच उपस्थित केला आहे. या पहिल्या विषयात पाचवी ते दहावीच्या आठ हजार २१५ विद्यार्थ्यांना ९८ रुपये किंमतीचे हे पुस्तक देण्यात येणार आहे. त्यासाठी आठ लाख पाच हजार सत्तर रुपये खर्चास मान्यता देण्याचा हा प्रस्ताव आहे.
या प्रस्तावासाठीही निविदाप्रक्रिया न राबविता `मे. स्पार्कल क्लासेस` कडूनच ते घ्यावे, असा आग्रह या प्रस्तावात करण्यात आला आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण प्रशिक्षणाप्रमाणे येथेही सेटलमेंट झाली की काय अशी शंका येत आहे. दरम्यान, हे पुस्तक तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना देण्याचा दुसरा विषयही विषय पत्रिकेवर आहे, ही धक्कादायक बाब आहे. कारण अगोदरच पाचवी ते दहावीतील मुलांना ते देण्यासाठी आठ लाख रुपये खर्चाला मंजूरी देण्याचा विषय सभेसमोर असतानाच पुन्हा तो तिसरी ते सातवीच्या मुलांना देण्याकरिता दुसरा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. म्हणजे पाचवी, सहावी व सातवीच्या मुलांना हे पुस्तक दोनदा दिले जाणार आहे. तसेच, दुसऱ्या विषयात (तिसरी ते सातवी) किती मुलांना ते देणार, त्यासाठी किती खर्च येणार हे नमूद करणे खूबीने टाळण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.