Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील राजकीय गणिते वेगाने बदलू लागली आहेत. मागील तब्बल ३५ वर्षांपासून शिरूरमधून जिल्हा बँकेत जाणारा संचालक हा अजित पवार यांच्या विचारांचा असायचा. स्थानिक पातळीवर दोन गटांमध्ये कितीही टोकाचा संघर्ष असला, तरी निवडून आलेला संचालक अखेर अजितदादांच्या छत्रछायेखाली जात असे. त्यामुळे ‘जिंकून येईल तो आमचा’ हे समीकरण वर्षानुवर्षे रूढ झाले होते.
मात्र, आता अजितदादा पवार यांच्या नावाचा धाक आणि थेट राजकीय छत्रछाया नसताना होणारी ही पहिलीच जिल्हा बँक निवडणूक आहे. त्यामुळे शिरूरमधील अनेक दिग्गजांची राजकीय ताकद, मतदारांवरील पकड आणि निवडणूक व्यवस्थापनाची कसोटी लागणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शिरूर तालुक्यातून तब्बल १३१ मतदार प्रतिनिधींचे ठराव झाले आहेत. यापैकी सुमारे ४६ ठराव हे तालुक्याच्या आणि गावगाड्याच्या राजकारणात मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या मातब्बरांच्या संस्थांचे असल्याने निवडणुकीचे गणित शेवटच्या क्षणापर्यंत बदलण्याची शक्यता आहे.
वरवर पाहता विद्यमान संचालक व माजी आमदार अशोक पवार, शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासूद, कोंढापुरीचे माजी सरपंच आणि दिवंगत संचालक अरुण आबा गायकवाड यांचे चिरंजीव स्वप्निल गायकवाड, तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.
मात्र ही यादी एवढ्यावरच थांबत नाही. शिरूरच्या राजकारणात सक्रिय असलेल्या पवार, गावडे, पाचर्णे घराण्यांसह राहुल गवारे, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार पोपटराव गावडे, राजेंद्र गावडे, आबासाहेब सोनवणे आणि आप्पासाहेब बेनके यांच्या मंडळींचेही ठराव बँकेसाठी आल्याने ऐनवेळी कोण मैदानात उतरणार आणि कोण कोणाला पाठिंबा देणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे.
शिरूरच्या जिल्हा बँकेच्या राजकारणाचा मागील तीन दशकांचा इतिहास पाहिला, तर तळेगाव, कोंढापुरी आणि विठ्ठलवाडी परिसराभोवती संचालकपदाचे राजकारण फिरत आले आहे. मात्र विद्यमान संचालक मंडळात माजी आमदार अशोक पवार यांची झालेली वर्णी हा या पारंपरिक समीकरणाला काहीसा अपवाद ठरला. यावेळी मात्र पारंपरिक बालेकिल्ले, नव्या राजकीय आघाड्या आणि संस्थात्मक ठराव यांचा मेळ कोण घालतो, यावर निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शिरूर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्येही मोठे बदल झाले. अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेल्या गटाकडून आगामी जिल्हा बँक निवडणुकीत माजी आमदार अशोक पवार यांच्या विरोधात ‘एकास एक’ उमेदवार देण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
मात्र इच्छुकांची संख्या मोठी असल्याने हा ताळमेळ साधणे हे विद्यमान आमदार माऊली कटके यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. एकाच जागेसाठी अनेक दावेदार असताना कोणाला संधी द्यायची, कोणाला थांबवायचे आणि कोणाला भविष्यातील राजकीय आश्वासन द्यायचे, याचे गणित जुळवावे लागणार आहे.
अजितदादा पवार यांच्या राजकीय प्रभावाखाली वर्षानुवर्षे चालत आलेले ‘जिंकून येईल तो आपला’ हे समीकरण आता प्रत्यक्षात कितपत टिकते, याची परीक्षा या निवडणुकीत होणार आहे. अजितदादा गटाला आपली संघटनात्मक मोट विस्कटू न देता मित्रपक्षांना विश्वासात घेऊन उमेदवार निश्चित करावा लागणार आहे. दुसरीकडे माजी आमदार अशोक पवार यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत दाखवलेले राजकीय शहाणपण आणि डावपेच पुन्हा वापरले, तर पारंपरिक समीकरणांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शिरूरची ही निवडणूक केवळ जिल्हा बँकेच्या एका संचालकपदाची लढाई राहिलेली नाही. ३५ वर्षांच्या राजकीय समीकरणाची पुढची दिशा ठरवणारी ही निवडणूक ठरणार आहे. कोणाची एंट्री होते, कोण माघार घेतो आणि ऐनवेळी कोण कोणाच्या गोटात जातो, यावरच शिरूरचा ‘बँकिंग बॉस’ ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.