Pune Police|
Pune Police| Sarkarnama
पुणे

पीएफआय आंदोलन : सहाजणांना अटक, दुपारी न्यायालयात हजर करणार!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुण्यात एटीएस आणि एनआयएच्या कोंढव्यातून पॉप्युलर फ्रंट इंडियाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली होती. या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले होते. यात सहभागी झालेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही आंदोलनकांनी यावेळी "पाकिस्तान जिंदाबादच्या" घोषणा दिल्याचा आरोपही केला जात आहे. आता या बाबत पुणे पोलिसांची कारवाईची माहिती मिळत आहे.

पीएफआयने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलन प्रकरणी पुणे पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातून ताब्यात घेतलेल्या या ६ जणांवर चौकशी करण्यात येणार आहे. पीएफआय आंदोलन प्रकरणी या ६ जणांची आता पोलिसांकडून कसून चौकशी होणार आहे. त्यांना आज दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणाचे राज्यभरात व एकूणच राष्ट्रीय स्तरावर याचे पडसाद उमटल्यानंतर "पीएफआय'च्या 60 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 41 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन 141 कलम अंतर्गत नोटीस बजावून त्यांना सोडून देण्यात आले होते. यानंतर आंदोलनकर्त्यांविरुद्ध दाखल गुन्ह्यात देशद्रोहाशी संबंधित कलमांचा समावेश करण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणाशी व्हायरल व्हिडीओ पोलिसांकडून एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हे संबधित व्हिडीओ बंडगार्डन पोलिस ठाण्यात जमा करून, तेथून ते सायबर फॉरेन्सिक लॅबमध्ये सत्यता पडताळणीसाठी पाठवणार आहेत. व्हायरल व्हिडीओ तपास पूर्ण झाल्यानंतरच देशविरोधी घोषणा कोणी दिल्या, याबाबतची नावे स्पष्ट होतील, त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, एनआयएने सोमवारी मध्यरात्री महाराष्ट्रासह ८ राज्यात जवळपास २५ ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे. यामध्ये औरंगाबादमधील १४ ठिकाणी छापेमारीची कारवाई करण्यात आली. १३ ते १४ पीएफआय कार्यकर्त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. तर सोलापुरातूनही एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. एनआयएची ही कारवाई रात्रभर सुरू होती. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंबंधी वृत्त दिले आहे.

ईडी आणि एनआयएकडून देशभरातून आजपर्यंत १०६ पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रासोबतच केरळ, मणीपूर आणि राजस्थान या राज्यांमध्येही पीएफआय कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT