Pimpri Chichawad News :
Pimpri Chichawad News : Sarkarnama
पुणे

Pimpri Chichawad News : पत्रकारांना नोटीसा देणाऱ्या पोलिसांची बिगरपरवाना मोर्चा काढणाऱ्यांवर कारवाई नाहीच !

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chichawad News : तळेगाव दाभाडे (ता.मावळ,जि.पुणे) नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे (Kishor Aware Murder) यांचा गेल्या शुक्रवारी (ता.१२) भरदिवसा नगरपरिषद आवारातच निर्घृण खून झाला. त्यांच्या खूनाच्या गुन्ह्यात नाव असलेल्या परंतु अटक न झालेल्यांना ती करावी,यासाठी आवारे समर्थकांनी परवा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.

दरम्यान, आवारेंच्या खूनानंतर प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे परवाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही तो काढण्यात आला. त्यानंतर प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याबद्दल मोर्चा आयोजकांवर पोलिसांनी अद्याप कारवाई केली नाही, हे विशेष. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही "किशोरभाऊंना न्याय मिळालाच पाहिजे."

या मागणीसाठी दीड हजारपेक्षा अधिकजणांनी पोलीस ठाण्यावर काढलेला हा मोर्चा पोलिसांनी मध्येच अडवला. त्यानंतर तेथेच मोर्चेकऱ्यांनी ठिय्या धरला. मावळचा बिहार होण्याची वाट पाहताय का? असे फलक त्यांच्या हातात होते. त्यात महिला आणि कष्टकऱ्यांचे प्रमाण लक्षणीय होते. पोलिस उपायुक्त डॉ.काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट समजूत घातल्यावे मोर्चा विसर्जित झाला. त्यानंतर मृत आवारेंच्या आई आणि माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी इतर आरोपींना तातडीने अटक करण्याबाबत पोलिसांना निवेदन दिले. त्यात त्यांनी आपल्या मुलाच्या हत्या म्हणजे मोटा कट असल्याचे म्हटले आहे.

ज्यांची नावे फिर्यादीत दिली आहेत त्यांना अटक न होणे हे कायद्याला धरून नाही,असे त्यात पुढे त्यांनी नमूद केले आहे. संपूर्ण तालुक्यात समाजसेवेतून व विकासकामातून एक वेगळा ठसा आपल्या मुलाने उमटवला होता. त्याची ही लोकप्रियता ही या गुन्ह्यातील संशयितांना खटकत होती. त्यांच्या मनमानी कारभाराला किशोर जाहीरपणाने जाब विचारात होता. म्हणून त्याचा काटा काढण्यात आल्याचा संशय या निवेदनात सुलोचना आवारे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, किशोर आवारेंच्या चार मारेकऱ्यांसह सुपारी देऊन त्यांचा खून करणारा या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि जनसेवा समितीच्या माजी नगरसेवकाचा मुलगा याच्यासह सातजणांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या गुन्ह्यात आरोपी असलेले स्थानिक आमदार सुनील शेळके,त्यांचे बंधू सुधाकर आणि कार्यकर्ता संदीप गराडे यांना अटक करावी,अशी किशोर आवारे यांची आईच नाही,तर परवा मोर्चा काढलेल्या त्यांच्या समर्थकांचीही मागणी आहे.तर, तपास सुरु असून त्यात आतापर्यंत दोषी आढळलेल्यांना अटक केली असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT