Chandrashekhar Bawankule sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad BJP news : भाजपची राज्य कार्यकारिणी तयार करताना जिल्हाध्यक्षांना विचारलेच नाही ? ; दोघांच्या भांडणात..

Pimpri Chinchwad bjp news updates : या कार्यकारिणीवर पक्षातून नाराजीचा सूर आहे.

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad bjp news updates : भारतीय जनता पार्टीची राज्य कार्यकारिणी नुकतीच (ता.३) जाहीर करण्यात आली आहे. उपाध्यक्ष, सरचिटणीस यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांना या कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे तर काहींना बढती देण्यात आली आहे.

प्रदेश कार्यकारिणी जाहीर करताना पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना विचारण्यात आले नसल्याचे पक्षातीलच विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच या कार्यकारिणीवर पक्षातून नाराजीचा सूर आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निकटच्या वर्तुळातील व्यक्तींनाच प्राधान्याने नव्या प्रदेश कार्यकारिणीत स्थान देण्यात आल्याची भाजपमध्ये चर्चा आहे. त्यातून जुन्याच नाही, तर नव्याने पक्षात आलेल्यांतही नाराजीचा सूर आहे. दरम्यान, आता नव्या जिल्हाध्यक्षांची निवड १५ मे पूर्वी केली जाणार आहेत. त्यासाठी, तरी विद्यमान जिल्हाध्यक्षांना पक्ष विचारात घेणार का,अशी कुजबुज ऐकू आली.

भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची मुदत संपल्याने तेथे नवे अध्यक्ष पक्ष देणार आहे. त्याची घोषणा तीन दिवसांपूर्वी होताच इच्छूक लगेच कामाला लागले आहेत. त्यासाठी पक्षाच्या शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी मुंबई मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

शहरातील तीन विधानसभा मतदारसंघापैकी भोसरी आणि चिंचवडमध्ये पक्षाचे आमदार आहेत. सध्या अध्यक्षपद भोसरीत आहे. त्यामुळे ते चिंचवडकडे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर,ते कायम ठेवण्यासाठी भोसरीतूनहीही मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांच्या भांडणात आमदार नसलेल्या पिंपरीत हे पद धक्कातंत्राने भाजप देऊ शकते, असा सूरही ऐकू येतो आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक जिंकून देईल, हा निकष नव्या शहराध्यक्ष निवडीमागे भाजप ठेवणार यात वाद नाही. अगोदरच एक वा दोन पदे असलेल्या पदाधिकाऱ्याकडे पुन्हा शहराध्यक्ष ते देणार नाहीत,अशीही अटकळ आहे. मात्र, पालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अपवाद केला जातो, हे ही पाहण्यासारखे आहे.

यावेळी पक्षातील जुन्याला ही संधी देण्यात येईल,असा अंदाज आहे. त्यामुळे भोसरी की चिंचवड आणि नवा की जुना आणि तरुण की अनुभवी चेहरा अध्यक्ष हे ११ तारखेनंतर व १५ मे पूर्वी कळणार आहे. दरम्यान, बावनकुळे हे उद्या शहरात येत असून ते नवा अध्यक्ष कोण करायचा याचा कानोसा घेणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT