Pimpri- Chinchwad Latest News Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad : महापालिकेतील TDR घोटाळ्याची चौकशी होणार ? थेट ED कडे तक्रार केल्याने एकच चर्चा

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri Chinchwad Latest News : पिंपरी-चिंचवड महापालिकेत शेकडो कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नुकताच (ता.१२) केला. त्यात उद्योगनगरीतील महायुतीच्या तिन्ही आमदारांसह महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह हे ही त्यात सामील असल्याचा हल्लाबोल महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकापरिषद घेऊन नंतर (ता.१५) पिंपरीत केला. तर, आज (ता.१८) संभाजी ब्रिगेडने त्याची थेट ईडीकडे तक्रार करीत चौकशीची मागणी केली.

वाकडमधील आरक्षित भूखंड खासगी विकासकाला विकसित करण्यासाठी देण्यात शासकीय नियमांची पायमल्ली करत यामध्ये दीड हजार कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा करण्यात आल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या घोटाळ्यात पिंपरी महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांची मुख्य भूमिका असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ईडीकडे केलेल्या तक्रारीत ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केली आहे.

प्रशासकीय राजवटीत महापालिकेच्या तिजोरीवर घालण्यात आलेला हा मोठा दरोडा आहे. तो सर्वांत मोठा स्कॅम आहे, असा दावा त्यांनी केला आहे. आरटीआयखालीही याबाबत माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. गायकवाड यांच्या नियुक्तीपासून ते आजपर्यंतच्या सर्व टीडीआर प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी त्यांनी ईडीकडे केली आहे.

वाकडमधील सो कॉल्ड टीडीआर घोटाळ्याची ईडीकडे तक्रार करण्यात आली असली तरी, त्याची दखल घेतली जाण्याची शक्यता कमी आहे. कारण ज्या काळात हा घोटाळा झाला, त्यावेळी पिंपरी महापालिकेत भाजपा सत्तेत होती. तसेच त्यात शहरातील महायुतीच्या तीन आमदारांचा सहभाग असल्याचा आरोप झाल्याने त्यात ईडी चौकशी होण्याची शक्यता वाटत नाही. तसेच विरोधी पक्ष वा त्यांच्या नेत्याचे या घोटाळ्यात नाव घेण्यात आले नाही. उलट त्यांनीच हा आरोप केला आहे, हे ही चौकशी न होण्याचे मुख्य कारण आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'TDR घोटाळा चौकशीसाठी SIT स्थापन करा'

विविध विषयांवर शहरातील ४ आमदार (भाजपचे भोसरीचे महेश लांडगे, चिंचवडच्या अश्विनी जगताप, विधानपरिषद सदस्या उमा खापरे आणि पिंपरीचे अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अण्णा बनसोडे) विधीमंडळात चर्चा करतात. मग शेकडो कोटी रुपयांच्या या टीडीआर घोटाळ्यावर ते गप्प का? अशी नेमकी व खोचक विचारणा आम आदमी पक्षाने (आप) आज केली. तसेच याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.

आयुक्त शेखर सिंह भाजपचे कलेक्शन एजंट आहेत का? असा सवाल आपचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष चेतन बेंद्रे आणि प्रवक्ते प्रकाश हगवणे यांनी यावेळी केला. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची वा मुंबई महापालिकेच्या धर्तीवर कॅगमार्फत चौकशी करण्याची आणि ती पूर्ण होईपर्यंत आयुक्त शेखर सिंहांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. २०१७ नंतर दिलेल्या टीडीआरची चौकशी करून वाकड प्रकरणात भूखंड मालक मे. विलास जावडेकर इन्फिनिटी प्रा.लि. यांना दिलेला टीडीआर रद्द करण्यात यावा, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT