AAP, Pimpri-Chinchwad
AAP, Pimpri-Chinchwad Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad News: 'आप' पिंपरी पालिका निवडणुकीत कुणाचा गेम करणार; भाजप की राष्ट्रवादी?

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक कधी होणार हे निश्चीत नाही. पण, तिचे पडघम राजकीय पक्षांत वाजू लागले आहेत. पिंपरी पालिका भ्रष्टाचार आणि टक्केवारीमुक्त करण्यासाठी पालिकेच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचे आज (ता.९) अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी तथा 'आप' ने जाहीर केले आहे.

दरम्यान, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय (युती) विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि कॉंग्रेस (आघाडी) अशा होऊ घातलेल्या दुरंगी लढतीत 'आप' उतरल्याने यावेळची पिंपरी पालिकेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच ती अधिक चुरसही निर्माण होणार आहे. तर, 'आप'च्या एंट्रीमुळे कुणाची मते कापली जाणार, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.

माजी सत्ताधारी भाजप आणि त्याअगोदरची राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोघांच्या भांडणात `आप` बाजी मारणार असल्याचा दावा पक्षाचे राज्य उपाध्यक्ष आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आज (ता.९) पिंपरीत केला. पिंपरी-चिंचवडकरांना बदल हवा असल्याचे ते म्हणाले. तसेच आम आदमी पार्टी कुणाची मते कापण्यासाठी नाही, तर सत्तेत येण्याकरिता ही निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'आप'चे पिंपरी पालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्तीनंतर पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद कीर्दत, शहराचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, शहराध्यक्ष अनुप शर्मा यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी राठोड यांनी शहरातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर निवडणुकीबाबत आढावा घेतला. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे सामान्य नागरिकांच्या पाठिंब्यावर पिंपरी चिंचवडमध्येही सत्ता हस्तगत करू. असा दावा राठोड यांनी यावेळी केला.

मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या आयाराम गयाराम संस्कृतीला थारा देणार नाही, असे सांगताना त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातून आलेल्यांना 'आप' घेणार नाही, हे स्पष्ट केले.

भारतीय संविधानाची अंमलबजावणी हाच आमचा जाहीरनामा असून त्यादृष्टीने कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवून मोफत दर्जेदार शिक्षण मोफत, उत्कृष्ट आरोग्य सुविधा, विद्यार्थी आणि महिला यांना मोफत बस प्रवास ही आमची विजन डॉक्युमेंट असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पालिकेत सत्तेत आलो, तर आत्तापर्यंतच्या सर्व प्रकल्पांचे महालेखापालांमार्फत चौकशी करून भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT