Mahesh Landge| Ajit Gavhane 
पुणे

प्रभाग कितीचाही असो, पिंपरी पालिकेत पुन्हा सत्तेत येणार : भाजपचा दावा

Pimpri-Chinchwad Politics| राज्यातील महापालिका निवडणूक ही तीनऐवजी पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने काल घेतला.

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : राज्यातील महापालिका निवडणूक ही तीनऐवजी पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने काल घेतला. तीनची रचना भाजपच्या (BJP) सोईची नसल्याने ज्या पद्धतीने ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ ला प्रथमच सत्तेत आली ती चारची पध्दत त्यांच्या पथ्यावर पडणार अशी चर्चा आहे. मात्र,प्रभाग कितीचाही असो पिंपरी महापालिकेत ( Pimpri Municipality) पुन्हा भाजपच सत्तेत येणार असा दावा पक्षाचे शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी `सरकारनामा`शी बोलताना केला.

१५ वर्षांची राष्ट्रवादीची सत्ता घालवून श्रीमंत पिंपरी पालिकेत भाजपला प्रथम सत्तेत आणण्यात आ. लांडगेंचा मोठा वाटा आहे. म्हणून गेल्या पाच वर्षात शहराचे कारभारी म्हणून ते ओळखले जाऊ लागले आहेत. जो कष्ट करतो, त्याला यश मिळतेच,अशी प्रतिक्रिया त्यांनी कॅबिनेटच्या निर्णयावर दिली. भाजपने गेल्या पाच वर्षात शहरात हे कष्ट म्हणजे कामे केलीत. म्हणून लोकांचा विश्वास भाजपवर आहे.यामुळे त्यांनीच आम्हाला सत्ता देण्याचे ठरवले आहे. प्रभाग तीनचाच असता, तरी पुन्हा जिंकलो असतो,कारण आम्ही शहरात विकासकामे केली आहेत,असे ते म्हणाले. याउलट राष्ट्रवादी कॉंग्रेसला विजयाचा आत्मविश्वास नाही. म्हणूनच त्यांनी प्रथम प्रभागाची मोडतोड केली. चारऐवजी तीनचा प्रभाग केला. नंतर मतदारयादीत फेरबदल केला,यातून त्यांचा विश्वास डळमळीत झाला असल्याचे दिसते, असे अनुमान त्यांनी काढले. आम्ही प्रामाणिक काम केलंय. त्यामुळे कितीचाही प्रभाग झाला,तरी पिंपरी पालिकेत भाजपचीच सत्ता येणार,असे ते ठामपणे म्हणाले.

निवडणूक तयारी अंतिम टप्यात आली असताना तसेच आठवडाभरात ती जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही राज्य सरकारने असा निर्णय घेणे योग्य नसल्याचे मत राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केले. लोकशाहीच्या हिताचा हा निर्णय नाही. तसेच तो कायद्याच्या कसोटीवरही टिकणार नाही, असे ते म्हणाले. त्यातून पिंपरीच नाही, तर राज्यभरातील महापालिका भाजपने वेठीस धरल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.`मनसे`ने या निर्णयाचे स्वागत केले आहे. कारण त्यामुळे काहीही फरक पडणार नाही,असे मनसेचे शहराध्यक्ष,माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी सांगितले. मतदारांनी एखाद्या पक्षाला मत द्यायचे ठरविले की त्यानंतर अशा निर्णयामुळे काही फरक पडत नाही. आगामी निवडणूक आम्ही ताकदीने लढू,असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT