Mahesh Landage, Ajit Gavhane
Mahesh Landage, Ajit Gavhane sarkarnama
पुणे

तीस वर्षात १२ संरक्षणमंत्र्यांकडून न सुटलेला रेड झोनचा प्रश्न सोडविण्याचे निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा गाजर

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) सहा लाख रहिवाशांना बाधीत करणारा व त्यांच्या मानेवर लटकती तलवार असलेला रेड झोन तथा संरक्षण विभागाच्या हद्दीचा प्रश्न गेली तीस वर्षे 12 संरक्षणमंत्री होऊनही सुटलेला नाही. प्रत्येक निवडणुकीत तो डोके वर काढतो. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांकडून तो सोडविण्याचे गाजर दाखवले जाते. निवडणूक संपते अन हा प्रश्न जसाच्या तसा पुढच्या निवडणुकीसाठी कायम राहतो.

आगामी पालिका निवडणुकीनिमित्त तो सोडविण्यासाठी लवकरच दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांनी दिल्याचे भाजपचे (BJP) शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी काल (ता.२०) संरक्षणमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितले. त्यावर निवडणुकीच्या तोंडावर ‘रेड झोन’चे गाजर दाखवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न लांडगेंकडून केला जात असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी काल लगेचच केला.

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी राजनाथसिंह आले होते. त्यानंतर लांडगेंनी 'रेड झोन' प्रश्नी त्यांना निवेदन देत रेडझोनची हद्द कमी करण्याची विनंती केली. शहरातील ५० हजार घरे रेडझोनमुळे बाधित असून तेथे सहा लाख नागरिक राहत आहेत. तेथील उद्योग आणि व्यवसायांवर विपरित परिणाम होत आहे. तेथे कोणतेही विकासकाम व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात महापालिका प्रशासनाला अडचणी येत आहेत.

दुसरीकडे रेडझोनमुळे अनेक भुमीपूत्र कुटुंब भूमिहीन झाली आहेत. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने रेड झोनची हद्द कमी करण्याचा निर्णय शेवटच्या टप्यात आला होता. पण, त्याला पर्रीकरांच्या अकाली निधनाने ब्रेक लागला. परिणामी ३० वर्षाचा हा प्रलंबित प्रश्न पुन्हा लटकला. १२ संरक्षणमंत्र्यांनाही तो मार्गी लावण्यात यश आलेले नाही.

निवडणुकीच्या तोंडावर लांडगेंकडून 'रेड झोन'चे गाजर

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लांडगेंकडून 'रेड झोन'चे गाजर दाखविले जात असून त्याचे भांडवल करीत राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे. २०१४ पासून हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देणाऱ्या व गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता उपभोगल्यानंतरही तो सोडवू न शकलेल्या लांडगेंना अचानक रेडझोन प्रश्नाची आठवण झाल्याने आश्चर्य व्यक्त वाटते आहे. असा टोला त्यांनी लगावला.

निवडणुकीपूर्वी राजकीय स्टंटबाजी करण्यात माहीर असलेल्या भाजप नेत्यांनी रेडझोन बाधितांच्या भावनांशी खेळू नये, असे ते म्हणाले. शहरालगत दिघी आणि देहूरोडला रेडझोन आहेत. त्याची हद्द कमी करण्याचे आश्वासन अनेक भाजप नेत्यांनी २०१४ ला दिले होते. त्यानंतर २०१७ च्या महापालिका निवडणुकीतही रेडझोनसह, अनधिकृत बांधकामे, शास्तीकर आदी आश्वासने त्यांनी दिली. मात्र, त्यातील एकही त्यांना पूर्ण करा आले नाही, याकडे गव्हाणेंनी लक्ष वेधले.

त्यामुळे सर्वसामान्यांच्या भावनांचा खेळ मांडून त्यांना केवळ आश्वासनाचे गाजर दाखविणे हा भाजप नेत्यांचा नित्याचा प्रकार झाला आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. केवळ बैठकांची नौटंकी करण्याचाच प्रकार आतापर्यंत केला गेला. आता महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे त्यांना रेडझोनच्या प्रश्नाची आठवण झाली आहे, असे ते म्हणाले. राजनाथसिंह गेली तीन वर्षे संरक्षणमंत्री आहेत. या कालावधीत रेडझोन प्रश्नी साधे पत्र न देणाऱ्या भाजपला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तो आठवला. शहरात दुसऱ्याच कामासाठी आलेल्या संरक्षणमंत्र्यांना निवेदन देण्याची त्यांना उपरती झाली. त्यातून या प्रश्नी किती गांभिर्य भाजपा नेत्यांना आहे हे स्पष्ट होते. निवेदन देऊन केवळ नौटंकी करणे, त्यातून पत्रकबाजी करून प्रसिद्धी मिळविणे इतकाच हेतू यामागे असल्याचे दिसून येत आहे, असा टीकेचा आसूड गव्हाणे यांनी ओढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT