Pimpri Chinchwad News :
Pimpri Chinchwad News : Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad News : "आक्रीतच घडले, ज्यांच्याविरूद्ध तक्रार मंत्र्यांनी त्यांच्याकडेच सोपवला तपास!"

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : ज्याच्याविरुद्ध तक्रार झाली आहे, त्याप्रकरणी त्यालाच तपास करण्यास सांगण्यात आल्याचा अजब आणि धक्कादायक प्रकार राज्यात प्रथमच घडला आहे. सांगलीचे सहाय्यक कामगार आय़ुक्त अनिल गुरव यांच्याविरुद्धच्या आरोपांवर त्यांनाच त्याबाबत तपास करून अहवाल सादर कऱण्यास राज्य़ाचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले आहे.

'कामगारांवरच अन्याय करणारे बेजबाबदार असे सांगलीचे सहाय्यक कामगार आय़ुक्त अनिल गुरव यांची बदली करावी', अशी मागणी शिवसेनेचे सांगली शहरप्रमुख हरिदास लेंगरे यांनी कामगारमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री खाडे यांच्याकडे केली होती. त्या पत्रावर खाडे यांनी गुरव यांनाच तपास करून अहवाल सादर करण्यास सांगितल्याने लेंगरे यांनी कपाळावरच हात मारून घेतला.

'चोर कधी म्हणणार आहे का, मी चोरी केली असे सांगत, जगातले हे आठवे आश्चर्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी सरकारनामाशी बोलताना दिली. प्रथमच एवढे निष्क्रिय कामगारमंत्री प्रथमच पाहिल्याचे ते म्हणाले. त्यांच्याकडून हे खाते ताबडतोब काढून घेण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, गुरव यांच्याविरुद्ध तक्रार केली तेव्हा ते कसे चांगले आहेत, हेच सांगण्याचा प्रयत्न मंत्री खाडे यांनी केला,असे लेंगरे म्हणाले. सहा वर्षे सांगलीत एकाच जागी असल्याने गुरव यांचे तेथे मोठे हितसबंध तयार झाल्याचा दावा त्यांनी केला.त्यामुळे कामगारांच्या तक्रारींना ते वाटाण्याच्या अक्षता लावत असून तक्रार आलेल्या उद्योगांवर कारवाई करीत नसल्याचे लेंगरेनी कामगारमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तक्रारदार कामगारालाच दमदाटी केली जात असल्याचे त्यात त्यांनी पुढे नमूद केले आहे.

गोदावरी उद्योग, सुयश कास्टिंग या दोन उद्योगांची उदाहरणे दिली.दोन्ही ठिकाणी एकेका कामगाराचा अपघाती मृत्यू होऊनही गुरव यांनी सदर उद्योगांविरुद्ध काहीच कारवाई केली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गोदावरी उद्योगात,तर अनोंदित कामगारांची भरती केल्यानंतरही त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई गुरव यांनी केली नसल्याची लेंगरेंची तक्रार आहे. परप्रांतीय कामगार ठेकेदारांना गुरव हे पाठीशी घालत असल्याने सांगली जिल्ह्यात परप्रांतीय कामगारांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढल्याचा आरोप लेंगरेंनी केला आहे.दरम्यान,यासंदर्भात खाडे यांच्य़ाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो झाला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT