Somnath Zende, Madhukar Zende Sarkarnama
पुणे

Somnath Zende News : चर्चेतील दोन पीएसआय झेंडे, एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगार शोभराजला पकडणारे, तर दुसरे...

उत्तम कुटे

Pimpri : सध्या सुरू असलेल्या वन डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारच्या (ता.१०) इंग्लंड विरुद्ध बांगलादेशच्या मॅचवरील ड्रीम इलेव्हन या मोबाईल गेमिंग अॅपवर (कायदेशीर जुगार) पिंपरी-चिंचवडमधील पीएसआय सोमनाथ झेंडे यांनी तब्बल दीड कोटी रुपये जिंकले. मात्र, काल (ता. ११) लगेच त्यांच्याविरुद्ध थेट राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच तक्रार करण्यात आल्याने झेंडेंच्या अडचणीत वाढ झाली. त्याचवेळी त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसांनी चौकशी सुरू केल्याने त्यांच्या अडचणीत भरच पडली.

`ऑनलाइन जुगार`खेळून करोडपती झालेल्या या पीएसआय झेडेंमुळे मुंबई पोलिस दलातील त्या पीएसआय (नंतर एसीपी म्हणून रिटायर) झेंडेंची आठवण झाली. त्यांची चर्चा सुरू झाली. पिंपरी-चिंचवडच्या दंगलविरोधी पथकात शिक्षा म्हणून सध्या काम करीत असलेल्या या सोमनाथ झेंडे यांना दोन वर्षांपूर्वी लाचखोरीत अटक झाली होती.

त्यावेळी ते चाकण पोलिस ठाण्यात होते. तेथे आलेल्या एका तक्रारीतील संशयिताविरुद्ध कारवाई न करण्यासाठी त्यांनी ८५ हजार रुपयांची लाच मागून ती आपल्या पंटरमार्फत (दलाल) घेतली होती. त्यात अटक होऊन त्यांचे निलंबन झाले होते. सहा महिन्यांच्या निलंबनानंतर ते पुन्हा पोलिस सेवेत आले; पण त्यांना साइड ब्रॅंच देण्यात आली. तेथे राहूनही त्यांनी हा कारनामा केला आहे.

मधुकर झेंडे यांची आठवण

उद्योगनगरीतील या झेंडेंच्या उद्योगामुळे मुंबईतील मधुकर झेंडे यांची तीव्रतेने आठवण झाली. कारण त्यांनी १७ नोव्हेंबर १९७१ रोजी आंतरराष्ट्रीय गुन्हेगार तथा स्मलगर आणि बिकीनी सीरिअल किलर चार्ल्स् शोभराज याला पकडल्याने त्यांची मोठी चर्चा झाली होती. त्यावेळी ते पीएसआय होते. शोभराजविरुद्धच्या गुन्ह्यात त्याला दिल्ली पोलिसांच्या हवाली केले गेले.

त्यावेळी तो ससून रुग्णालयातून ड्रगमाफिया ललित पाटील जसा नुकताच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला, तसाच तो भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यावर रुग्णालयातून पळून गेला. दुसऱ्यांदा त्याला पुन्हा झेंडे यांनीच गोव्यात जाऊन चार दिवस पाळत ठेवून मोठ्या शिताफीने पकडल्यानंतर त्यांची मोठी वाहवा झाली होती. १९९६ ला ते मुंबई पोलिस दलातून एसीपी म्हणून रिटायर झाले.

चौकशीनंतर झेंडेंविरुद्ध कारवाई?

काल (गुरुवारी) पिंपरी-चिंचवड भाजपचे माजी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी झेंडेंविरुद्ध फडणवीसांकडे लेखी तक्रार केली. ऑनड्यूटी ऑनलाइन जुगार खेळून त्यासाठी लहान मुलांना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी त्यांनी केली. त्याची लगेच दखल घेण्यात आल्याने तेव्हाच झेंडे अडचणीत आले आहेत, पण वरून आदेश येण्यापूर्वी की लगेच आला म्हणून शहर पोलिसांनी कालच या झे़ंडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. गुन्हे शाखेच्या डीसीपी स्वप्ना गोरेंनी ती सुरू केली. या चौकशीनंतर झेंडेंविरुद्ध कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, असे एसीपी सतीश माने यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT