Pimpri Congress
Pimpri Congress  Sarkarnama
पुणे

राज्यपालांविरोधात रोष थांबेना; पिंपरी काँग्रेस पाठवणार च्यवनप्राश

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : ''राज्यपाल व भाजपच्या नेत्यांना सद्बुद्धी यावी, त्यांची स्मरणशक्ती वाढावी, यासाठी त्यांना काँग्रेसच्यावतीने च्यवनप्राश पाठवणार आहे'', असं पिंपरी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद सध्या राज्यभर उमटत आहेत. यावर बोलताना कदम यांनी त्यांच्यावर घणाघाती टीका केली.

राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये संभाजी ब्रिगेडने कोश्यारींच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या हकालपट्टीची मागणी सोमवारी (दि.२१) केली. तर, आज शहर कॉंग्रेसने कोश्यारींसह छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह टिपण्णी करणारे सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.

काँग्रेसचे (Congress) शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वात शिवस्मारक, एच.ए.कॉलनी गेट, पिंपरी येथे हे निषेध आंदोलन करण्यात आले. त्यात शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, सेवा दलाचे शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, मागासवर्गीय विभागाचे शहराध्यक्ष विजय ओव्हाळ आदी सहभागी झाले होते.

यावेळी राज्यपाल, त्रिवेदी व भाजप (BJP) यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कदम म्हणाले, ''राज्यपाल व भाजपच्या नेत्यांना सद्बुद्धी यावी, त्यांची स्मरणशक्ती वाढावी म्हणून त्यांना च्यवनप्राश पाठवणार आहोत. संविधानिक पदावरील राज्यपालांचं हे वक्तव्य चुकीचं आहे'', असं म्हणत त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला.

''राज्यपालांच्या अशा विधानातून समाजात असंतोष निर्माण होतो, शिवरायांच्या कर्तृत्वामुळे आज आपण सर्वजण सुरक्षित असून त्यांचा इतिहास हा कालबाह्य होऊ शकत नाही, तर तो येणाऱ्या पिढ्यांनाही कायम प्रेरित करत राहील'', असे कदम म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी त्रिवेदी यांच्यावर हल्लाबोल त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT