PCMC, Namdev Dhake Sarkarnama
पुणे

पिंपरी महापालिकेला मिळालेला पुरस्कार हा राष्ट्रवादीसाठी ‘आरसा’

BJP|PCMC : भाजपचे माजी पक्षेनेते नामदेव ढाके यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान या राज्यस्तरीय स्पर्धेत सन २०२१-२२ या वर्षासाठी प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना या गटात पिंपरी महापालिकेला (PCMC) प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळे भाजपच्या सत्ताकाळात विकासकामे झाली नाही, लोकाभिमूख कारभार झाला नाही, असे आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) महाविकास आघाडी सरकारनेच (Mahavikas Aghadi Government) ‘आरसा ’दाखवला असल्याचा टोला पिंपरी पालिकेतील मावळते सत्ताधारी भाजपचे (BJP) माजी पक्षेनेते नामदेव ढाके (Namdev Dhake) यांनी आज (ता.२० एप्रिल) लगावला.

कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व कार्यपद्धतीचा अंगीकार, ई- गव्हर्नन्स, लोकाभिमुख कार्यालय या उपक्रमात पिंपरी पालिका अव्वल ठरली. त्याबद्दल दहा लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, असे पारितोषिक राज्य शासनाने जाहीर केले. हे निमित्त साधून भाजप अगोदर पालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीवर ढाके यांनी सडकून टीका केली. राष्ट्रवादीने वीस वर्षे सत्ता भोगली. मात्र, लोकाभिमूख कामे केली नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी २०१७ मध्ये सत्ता परिवर्तन घडवले, असे ते म्हणाले.

भाजपच्या हातात शहराचा कारभार आल्यानंतर प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरीता भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्वांतत्र्य तर दिलेच, त्याशिवाय सकारात्मक निर्णयही घेतले, असा दावा त्यांनी केला. भाजपच्या सत्ताकाळात प्रशासकीय कामकाजामध्ये नवनवीन संकल्पना आणि कार्यपद्धतींचा अंगीकार केला. लोकाभिमुख कार्यालयाचे व्यवस्थापन केले. नागरिकांना ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे पालिकेचे कामकाज राज्यात अव्वल ठऱले. नागरिकांचा सहभाग व योगदानामुळे हे शक्य झाले आहे, असे ढाके म्हणाले.

पिंपरीतील स्मार्ट सिटीच्या कामात भ्रष्टाचार झाला, असा आरोप राष्ट्रवादीने केला. मात्र, स्मार्ट सिटीतीलच कामांसाठी सुरत येथे झालेल्या सोहळ्यात ओपन डेटा विक, क्लायमेट चेंज आणि प्लेस मेकींग अशी तीन पारितोषिके पिंपरी महापालिकेला मिळाली. देश पातळीवरील स्पर्धेतील ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने बिनबुडाचे आरोप करुन नागरिकांची दिशाभूल करण्याचे राजकारण करण्यापेक्षा आपण सत्तेत असताना काय-काय चुका केल्या? याचे आत्मचिंतन करावे, असा सल्लाही ढाके यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT