Pimpri Chinchwad News : ED
Pimpri Chinchwad News : ED Sarkarnama
पुणे

Pimpri News : 'ईडी'चा पिंपरीत पहिलाच अराजकीय छापा ; घबाड हाती लागणार?

उत्तम कुटे

पिंपरी : अंमलबजावणी तथा सक्तवसुली संचालनालय (ईडी) ही राजकीय कारवाय़ांमुळे बदनाम झाली आहे.त्यातून या केंद्रीय यंत्रणेचा राजकीय गैरवापर होत असल्याचा आरोप होत असून, त्याचा महाराष्ट्रात प्रत्ययही आला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये काल (ता.२७) पडलेला `ईडी`चा पहिलाच छापा तथा कारवाई ही मात्र अराजकीय म्हणावी लागेल सत्ताधाऱ्यांशी सबंधितांवर ती केली जात नसल्यालाही या छाप्यातून छेद मिळाला.

उद्योगनगरीतील सेवाविकास को-ऑपरेटीव्ह बॅंकेतील ४३० कोटी रुपयांच्या बोगस कर्जवाटप आणि आर्थिक गैरव्यवहारातील आऱोपी आणि या बॅंकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदांनी यांच्या पिंपरी कॅम्पातील निवासस्थानी `ईडी`ने काल छापेमारी केली. ते भाजपशी संबधित होते. हा घोटाळा उघड होईपर्यंत ते भाजपच्या सहकार विभागाच्या राज्य सेलवर पदाधिकारी होते.

त्यातून पिंपरी महापालिकेच्या गत टर्ममधील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांची त्यांच्या काल ईडीची रेड झालेल्या कार्यालयात ये जा होती. पक्षाचे एक आमदारही त्याला अपवाद नव्हते. त्यापूर्वी ते शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक होते. तर, राजकारणातील त्यांची एंट्री ही कॉंग्रेसमधून झाली होती. त्या पक्षाकडून ते दोनदा नगरसेवक झाले होते.

गुंतवणुकादारांचे हित न जोपासता त्यांचे नुकसान केल्याबद्दल मुलचंदानींवर कारवाई झालीआहे. बनावटगिरीतून नियमबाह्य कर्जवाटप आणि गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. त्यामुळे सेवाविकास बॅंकेचा परवाना रिझर्व बॅंकेने रद्दही केला आहे. तत्पूर्वी या घोळ्याप्रकरणी १६ गुन्हे दाखल होऊन त्यात मुलचंदानींसह काहींना अटकही झाली होती.

एवढेच नाही, तर त्यात आरोपपत्रही न्यायालयात दाखल झाल्यानंतर ही छाप्याची कारवाई झाल्याने त्यातून काही हाती लागणार नाही, असा दावा मुलचंदांनींचे वकील अॅड अतिश लांडगे यांनी `सरकारनामा`शी बोलताना आज केला.

दुसरीकडे, मुलचंदानीच्या घरासह त्यांच्या कार्यालयाच्या झाडाझडतीची ही कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. आक्षेपार्ह कागदपत्रांसह रोकडही त्यात ईडीच्या हाती लागली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.या कारवाईसाठी मुलचंदानी अजिबात सहकार्य करीत नसल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

ईडीचे अधिकारी आले तेव्हा त्यांनी दरवाजा न उघडल्याने तो तोडावा लागला,असे या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ही कारवाई सुरु असतानाच छातीत दुखू लागल्याने मुलचंदांनींना प्रथम महापालिकेच्या पिंपरी येथील वायसीएम आणि नंतर पुण्यातील ससून या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT