पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (PCMC CP Krishna Prakash) यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करणे, खंडणी उकळण्याचे प्रकार सध्या वाढीस लागले आहेत. तीन दिवसांपूर्वी (ता.२५ मार्च) पीआय़ पाटील असे नाव सांगणाऱ्या एकाने पोलिसांकडून बदली करून देतो, असे सांगून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घडला. तर, या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी (ता.२६ मार्च) कृष्णप्रकाश यांच्याशी चांगली ओळख असून त्यांच्यामार्फत कामे करून देण्याचे आश्वासन देत रोशन संतोष बागूल (वय २२) हा दुसरा ठकसेन अनेकांना गंडवत असल्याचे दिसून आले. त्याच्याविरुद्ध देहूरोड पोलिस ठाण्यात खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर, असाच गुन्हा तोतया पीआय पाटीलविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यातही (Pimpri Police) नोंद करण्यात आला आहे.
कृष्णप्रकाश यांचे नाव घेऊन बदल्या करून देतो, असे सांगून पोलिसांकडूनच पैसे घेणाऱ्या पाटील नाव सांगणाऱ्या तोतया पीआयला कोल्हापूरातून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी काल (ता.२७ मार्च) पकडून आणले, असे कृष्णप्रकाश यांनी 'सरकारनामा'ला आज (ता. 28 मार्च) सांगितले. अमित जगन्नाथ कांबळे (वय ३५, रा. नवीपेठ पुणे) असे त्याचे नाव आहे. बदलीचा कालावधी पूर्ण झालेल्या भोसरी एमआय़डीसी पोलिस ठाण्यावरील हवालदार रुपाली रविंद्र सोनवणे (वय ३३) यांची बदली घराजवळील चिखली पोलिस ठाण्यात करून देतो, असे सांगून या नकली पीआय पाटीलने १५ हजार रुपयांची मागणी करून त्यातील पाच हजार रुपये गूगल पे व्दारे स्वीकारले होते. हे पैसे आयुक्त कृष्णप्रकाश यांना द्यायचे आहेत, अशी थाप त्याने मारली होती. आपण पिंपरी-चिंचवड पोलिस कंट्रोल रुममधून बोलत असल्याचे त्याने सांगितले होते.
दरम्यान, ज्यांच्या खात्यात त्याने हे फसवणुकीचे पैसे जमा करून घेतले ते हेमंत सुरेश तुर्भेकर आणि महावीर परिसा अकोळे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कांबळेच्या मोबाईलवरून त्याचे लोकेशन ट्रेस करून त्याच्या व त्याच्या साथीदारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. अशाप्रकारे कांबळेने इतर अनेकांनाही फसविले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या गुन्ह्याचा तपास पीआय प्रदीप पाटील करीत आहेत.
दरम्यान, आपलीच नाही, तर मुंबईचे पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांची सुद्धा ओळख असल्याचे सांगत खंडणी उकळीत फसवणूक करणाऱ्या बागूल (रा.देहूगाव,ता.हवेली,जि.पुणे, मूळचा सोनजाब, ता.दिंडोरी, जि.नाशिक) याला स्वत कृष्णप्रकाश यांनी वेषांतर करून रविवारी (ता.२६ मार्च) निगडी येथे एका हॉटेलात पकडले. त्यासाठी त्यांना बागूलचे घरमालक विन्सेट अलेक्झांडर जोसेफ (वय ५२) यांची मोठी मदत झाली. वादातील जमिन सोडवून देतो, असे सांगत तीन लाखांची मागणी करून एक लाख रुपये घेताना बागूलला पकडण्यात आले. त्याच्याबरोबर त्याची पत्नी गायत्री (वय २२) आणि पूजा माने (वय २२) या तरुणीलाही अटक करण्यात आली. त्याचे दोन साथीदार, मात्र फरार झाले आहेत. या टोळीने अनेकांना अशाप्रकारे गंडवल्याचा पोलिसांचा संशय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.