Praveen Darekar
Praveen Darekar Sarkarnama
पुणे

महाआघाडीच्या नेत्यांचे खासगी वाहतूकदारांशी सेटलमेंट; एसटीच्या खासगीकरणाचा त्यांचा डाव

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : एसटी कामगारांचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण तुम्ही जाहीर करा, त्यासाठी पैसे कसे उभे करायचे, ते आम्ही सांगतो, असे खुले आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिले. आघाडीतील काही नेत्यांचाच एसटीचे खासगीकरण करण्याचा डाव असून, खासगी प्रवासी वाहतूकदारांशी त्यांचे ‘सेटलमेंट’ झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला. (ploy of some leaders of the mahavikas aghadi to privatize ST : Praveen Darekar)

एसटी कामगारांचे निलंबन मागे घ्या; अन्यथा महामंडळाच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला. ते म्हणाले, ‘एसटी कामगारांचा संप पेटण्यास महाविकास आघाडी सरकारच कारणीभूत आहे. आता विकोपाला गेलेल्या या आंदोलनावरून सामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आघाडीतील नेते दिशाभूल करणारी वक्तव्ये करीत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक वेगळे बोलून वातावरण गढूळ करीत आहेत.

एसटी कामगारांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे पगार देण्याचा प्रश्‍न 15 दिवसांत धसास लावू, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या कोल्हापूरच्या अधिवेशनात जाहीर केले होते. राज्य सरकारचे कर्तेधर्ते असल्याने त्यांनी हा प्रश्‍न सोडवावा. आम्ही लगेचच आंदोलनातून बाहेर पडतो. या संपाला हिंसक वळण लागल्यास त्यास राज्य सरकारच जबाबदार असेल, असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला.

कंगणा राणावत यांनी केलेल्या वक्तव्यावरून छेडले असता, स्वातंत्र्यवीरांचे बलिदान अनन्यसाधारण असून, त्याबाबत कुणाचे दुमत नाही. त्यावरून कुणी वेगळे बोलले तर त्याचे समर्थन करता येणार नाही, असे प्रवीण दरेकर म्हणाले. बंद काळात तोडफोड, जाळपोळ करणारे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा त्यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला. त्रिपुरात काही घडले नसताना इथे अशांतता माजविण्याचा प्रयत्न झाला. त्यावरील उत्स्फूर्त जनतेची ती प्रतिक्रिया होती व त्यात सर्वच पक्षांचे कार्यकर्ते होते, असे ते म्हणाले. सत्तेच्या नादात नादान झालेल्या शासनकर्त्यांची खेळी जनतेच्या लक्षात आली आहे. करंट विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी दुसराच कुठलातरी विषय पुढे आणायचा, ही त्यांची नीती आहे, असा टोलाही दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT