Sanjay Singh
Sanjay Singh Sarkarnama
पुणे

'पंतप्रधान मोदींना अदानीला जगात पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत बनवायचे आहे'

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर आम आदमी पक्षाचे (AAP) नेते व खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 'मोदींना त्यांचे मित्र उद्योगपती गौतम अदानी (Adani) यांना जगात पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत बनवायचे आहे, तर आम्ही भारताला जगात पहिल्या क्रमाकांचे देश बनवायचा प्रयत्न करत आहोत. भाजपात आणि आमच्या आर्थिक प्राधान्यात हाच मुख्य फरक आहे, अशा शब्दात संजय सिंह यांनी नरेंद्र मोदी लक्ष्य केले. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी व नापास झालेले सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

संजय सिंह म्हणाले, सत्तेवर येण्याआधी त्यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली. दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करू, असे सांगितले होते. मागील ७ वर्षांत देशामध्ये प्रत्यक्षात फक्त ७ लाख रोजगार निर्मिती झाली. ही सरकारचीच संसदेत दिलेली अधिकृत संख्या आहे. हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडवून अनेक उद्योगपती देश सोडून पळून गेले. त्यांची कर्जे सरकारडून माफ करण्यात आली. याची वसूली आता जनतेकडूनच होत असून, जनतेवर विविध कर लावून वसूल केले जात आहे. रोजच्या खाण्यापिण्याच्या जीवनावश्यक पदार्थांवरसुद्धा मोदी सरकारने कर लावला आहे.

आम आदमी पक्षाच्या वतीने पुणे गणेश कला क्रीडा मंदिर येथे खासदार संजय सिंह यांची जाहीर सभा शुक्रवारी (१६ सप्टेंबर) दुपारी पार पडली. प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, महाराष्ट्र संघटक विजय कुंभार, तसेच महादेव नाईक, अभिजित मोरे, प्रीती मेनन यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष राचुरे यांनीही केंद्र सरकार वर टीका केली. सरकारकडे कसलीही नीती नसल्याचे राचुरे म्हणाले.

आपच्या कार्यक्रमातील विशेष बाब म्हणजे, आदर्श सरपंच म्हणून ओळख असणारे भास्कराव पेरे पाटील हे देखील या वेळी उपस्थित होते. आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, असे पेरे पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र आपचे धोरण, त्यांचे कामकाज आपल्याला पटत असल्यानेच आपण व्यासपीठावर उपस्थित होतो, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT