Sharad pawar ncp news Sarkarnama
पुणे

Narendra Modi: महात्मा फुलेंच्या विचारांचा मोदींकडून अपमान; राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक

Sudesh Mitkar

Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान ते भिडे वाड्याच्या कामाचे भूमिपूजन करणार आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ज्या कामाचा प्रारंभ यापूर्वीच झालेला आहे, त्या कामाचे पुन्हा भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधानांनी येणे हा मोठा विनोद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

"भिडे वाड्याचे काम हे सरकारच्या प्रयत्नांनी नव्हे तर कोर्टाच्या आदेशाने सुरू झाले आहे. ज्यात आपलं कर्तुत्व नाही त्या गोष्टींचे श्रेय घेण्याची नरेंद्र मोदींची धडपड केविलवाणी आहे.अशी टीका जगताप यांनी केली आहे.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे सत्यशोधक विचारांचे होते, कर्मकांड त्यांना मंजूर नव्हते. हे सत्य संपूर्ण जगाला माहिती असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनाच्या निमित्ताने भिडे वाड्यात कर्मकांड करण्याचा घाट घातला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला अनुसरून पंतप्रधान मोदी हे महात्मा फुलेंच्या विचारांचा अपमान करत आहेत हे अत्यंत निंदनीय आहे.

नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यात यापूर्वीच मेट्रोच्या विविध मार्गीकांचे लोकार्पण झाले आहे. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात यायचं व मेट्रोच्या छोट्याशा टप्प्याचा उद्घाटन करायचं ही नरेंद्र मोदींची शैली पुणे शहरात विनोदाचा विषय झाली आहे. किंवा निवडणुका जिंकण्यासाठी सुरू असलेल्या या माकडचेष्टा आम्ही पुणेकरांसमोर उघड करू असा इशाराही प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

मंडई मेट्रो स्टेशनच्या नावावरून ठाकरे गट आक्रमक

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान करण्यात येणाऱ्या मेट्रोच्या उद्घाटनावर आक्षेप घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले, "महामेट्रो रेलच्या माध्यमातून पुणे शहरात होत असलेल्या मेट्रोच्या स्थानिकांना नाव देताना आपणाकडून नेहमी इतिहासाची तोडफोड करण्याबरोबरच महापुरुषांच्या नावाचा विसर पडणे, चुकीचे नाव देणे असे प्रकार करण्यात आले आहेत. त्याबाबत शिवसेनेच्या वतीने अनेकदा निवेदन आंदोलन करण्यात आले आहे. यामधे आपला नवीन प्रताप म्हणजे महात्मा फुले मंडई असा मंडईचा नामोल्लेख असताना येथील मेट्रो स्थानकाला मंडई असे नाव देण्याचे कारण काय ? महापुरूषांचा नामोल्लेख टाळून त्यांचा अवमान करण्याचे कारण काय? असा सवाल आम्ही आपणास समस्त पुणेकरांच्या वतीने विचारत आहोत. महात्मा फुले मंडईच्या नामोल्लेखाचा इतिहास आपणास माहिती करून देत आहोत.

आपल्या देशात इंग्रज राज्य करीत होते त्याकाळात म्हणजे 1882 सालात इंग्रजांनी मंडईचा बांधण्याचे काम चालू केले. 5 ऑक्टोबर 1886 मध्ये बांधकाम पूर्ण होउन मंडईला त्यावेळेच्या गव्हर्नर लॉर्ड रे मार्केट इंडस्ट्रीयल म्युझियम असे नाव देण्यात आले. मात्र 1938 मध्ये नगरपरिषदेत आचार्य अत्रे यांनी ठराव मांडून मान्य करून मंडईला "महात्मा फुले मंडई" असे नामकरण करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात देण्यात आलेले नाव व त्याकाळातील इतिहास पुसण्याचा काम आपण करीत आहात. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. त्वरीत या नावात बदल करण्यात यावा. आमच्या माहितीनुसार येत्या 27 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या उद्घाटना अगोदर हे नाव बदलण्यात यावे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने पुन्हा उग्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. आपण पुणे शहरात मेट्रो स्थानकाला अशी चुकीची नाव देऊन वेगळा पायंडा पाडू नका, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT