पुणे

PM Modi Inaugurate Metro Live Updates : मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा

सरकारनामा ब्यूरो

ही मेट्रो नेटवर्क आधुनिक भारतातील शहरांची नवी लाईफलाईन बनली आहे. आज देशात आठशे किलोमीटर पेक्षा जास्त मेट्रोलाईनचे जाळे पसरले आहे. इतकेच नव्हे, तर एक हजार किलोमीटर पेक्षा जास्त मेट्रोचे जाळे पसरवण्यासाठी काम सुरु आहे. २०१४ मध्ये फक्त पाच शहरात मेट्रो होती, आज देशातील २० शहरात मेट्रो संचालित आहे. महाराष्ट्रात मुंबईशिवाय नागपूर आणि पुण्यातही मेट्रोचे जाळे पसरले आहे. पुण्यासारख्या शहरात, पर्यावरणासाठी प्रदुषण कमी करण्यासाठी मेट्रोचे जाळे महत्त्वाचे आहे.

लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमानंतर पंतप्रधान शिवाजीनगरमधील पोलीस ग्राउंडवर होणाऱ्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी उपस्थित आहेत. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे आणि विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पिंपरी चिंचवड येथील पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे लोकार्पण करण्यात आले.

पुरस्कारात मिळालेली रक्कम 'नमामि गंगे' योजनेला समर्पित - नरेंद्र मोदी

याप्रसंगी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, 'लोकमान्य टिळक पुरस्कार मला मिळणं हे माझं भाग्यच आहे. या भूमीत मला हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. पुणे ही फुले चाफेकर बंधुंची भूमी. हा पुरस्कार देशवासियांनी समर्पित करत आहे." तसेच, पुरस्कारासोबत मिळणारी रक्कम नमामि गंगे योजनेसाठी दान करत असल्याचेही त्यांनी व्यासपीठावरूनच घोषित केले.

Narendra Modi

नरेंद्र मोदी यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकमान्य टिळक यांच्या १०३ व्या पुण्यतिथीनिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांना पुरस्कार देण्यात आला. स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि पुणेरी पगडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, डॉ. दिपक टिळक हेदेखील उपस्थित होते.

पुरस्कार सोहळ्यासाठी नरेंद्र मोदी सर परशुराम महाविद्यालयात दाखल

बाप्पाच्या पूजेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी सर परशुराम महाविद्यालयात दाखल झाले आहेत. हा पुरस्कार सोहळा एक तास चालणार आहे.

पंतप्रधान मोदी दगडूशेठ मंदिरात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी महाविद्यालयातून दगडूशेठ गणपती मंदिराकडे रवाना झाले आहेत. मंदिरात बाप्पाची आरती आणि पूजा करत आहेत.

नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला संमिश्र प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. एकीकडे त्याचे चाहते त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत. तर दुसरीकडे त्यांचे विरोधक आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या दौऱ्याला विरोध करताना दिसत आहेत. काँग्रेससह विरोधी पक्षाचे काही नेते आणि सामान्य नागरिक, मणिपूरचे नागरिकही या आंदोलनात 'गो बॅक मोदी' अशी घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

नरेंद्र मोदी पुणे विमातनळावर दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमातनळावर पोहचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज्यपाल रमेश बैस यांनी मोदींचे स्वागत केलं. यावेळी शहरातील भाजपनेतेही याठिकाणी उपस्थित होते.

मणिपूरच्या हिंसाचाराचे पडसाद पुण्यातही उमटले

मणिपूरच्या हिंसाचाराचे पडसाद आता पुण्यातही उमटले आहेत. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात मणिपूरचे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आणि पुणे, पिंपरी चिंचवडमधील विकासकामांच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्रातील फोडाफोडीचे राजकारण, सत्तासंघर्ष, मणिपूर हिंसाचार अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधकही आक्रमक झाले आहेत. पंतप्रधानांच्या मोदींच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सोमवारीच पुण्यात दाखल झाले आहे. मात्र विरोधकांची आक्रमकता, विरोध आणि पंतप्रधानांच्या दौऱ्याची उत्सुकता या सर्व गोष्टीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT