PM Modi Pune Visit  Sarkarnama
पुणे

PM Modi Pune Visit : भष्ट्राचाराचे आरोप केलेल्यांकडून मोदी पुरस्कार स्वीकारणार का ?; ठाकरे गटाचा सवाल

PM Modi Pune Visit Update : शरद पवार गैरहजर राहिले असते तर त्यांचे नेतृत्व, हिंमत यास सह्याद्रीने दाद दिली असती.

सरकारनामा ब्युरो

Pune : टिळक पुरस्काराच्या निमित्ताने आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच व्यासपीठ येणार असल्याने शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र 'सामना'मधून या कार्यक्रमावर निशाणा साधला आहे. मोदी-पवार एकत्र येणं हे ठाकरे गटाला खटकले आहे. भष्ट्राचाराचे आरोप केलेल्यांकडून मोदी पुरस्कार स्वीकारणार का , असा प्रश्न 'सामना'तून विचारण्यात आला आहे.

"नेते मोदी सोबत व्यासपीठावर व कार्यकर्ते हाती काळे झेंडे घेऊन रस्त्यावर मोदींविरोधात उभे राहतील, अशी परिस्थिती पुण्यात निर्माण झाली आहे, देवा दगडूशेठ गणराया, तूच हे त्रांगडे सोडव रे बाबा," अशी आर्त हाक ठाकरे गटाने गणरायाला घातली आहे.

मोदी यांना आज टिळक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. विविध विकासकामांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. मोदी यांच्या दौऱ्यावेळी आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काही सामाजिक संघटनांनी दिला आहे. पवार मोदींच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याने ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे.

"देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू आहे, अशावेळी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत, मोदींच्या पुणे दौऱ्यात 93 वर्षांचे बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली 'इंडिया फ्रंट' च्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध केला जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील अशी विचित्र परिस्थिती पुण्यात निर्माण झाली आहे," असे अग्रलेखात म्हटलं आहे.

"महिन्यापूर्वी मोदी यांनी शरद पवारांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप केले होते. त्यानंतर लगेच त्यांचा पक्ष फोडला. शरद पवार हे पुण्यातील आजच्या कार्यक्रमास हजर राहून मोदींचे स्वागत करणार हे काही लोकांना आवडलेले दिसत नाही. खरं तर लोकांच्या मनात आपल्याविषयी असलेली साशंकता दूर करण्याची चांगली संधी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून शरद पवार यांना साधता आली असती," असे अग्रलेखात म्हटलं आहे.

या कार्यक्रमास शरद पवार गैरहजर राहिले असते तर त्यांचे नेतृत्व, हिंमत यास सह्याद्रीने दाद दिली असती. मोदी हे लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार घेतील, शरद पवार संसदेत विधेयकास विरोध करण्यासाठी हजर राहण्याऐवजी मोदींना पुरस्कार देतील हे पवारांच्या चाहत्यांना आवडणार नाही, असा टोला अग्रलेखात लगावला आहे.

मोदींच्या दौऱ्या आधीच पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शहरात पंतप्रधानांविरोधातील बॅनर झळकले आहेत. मोदींना विरोध करणाऱ्यांना प्रतिविरोध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते प्रतिआंदोलन करणार आहे. मोदींच्या दौऱ्यानिमित्त भाजप आणि मोदी विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT