पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी महापालिकेचे तब्बल 11 हजार 600 कोटींचे बजेट सादर केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे बजेट दोन हजार कोटींनी अधिक असून, आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणारे हे बजेट ठरले आहे. या बजेटच्या माध्यमातून आयुक्तांनी सुरू असलेल्या प्रकल्पांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच बाणेर परिसरामध्ये भाडेतत्त्वाने घर देण्याचा प्रकल्प उभारणार असल्याची मोठी घोषणा या वेळी आयुक्त विक्रांत कुमार यांनी केली.
अंदाजपत्रकात (PMC Budget 2024) पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने कोणतीही करवाढ केलेली नाही. त्यामुळे सलग आठव्या वर्षी पुणेकरांवर कोणतीही करवाढ असणार नाही. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हे अंदाजपत्रक सादर केले असल्याने ते प्रशासकाचे अंदाजपत्रक आहे की, निवडणुकांचे? याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, बजेटच्या माध्यमातून आयुक्त विक्रम कुमार (Viram Kumar) यांनी भाडेतत्त्वावरील घरांबाबत एक मोठी घोषणा केली आहे. महापालिका बाणेर परिसरामध्ये मोठ मोठ्या इमारती उभारून त्यामधील घरे भाडेतत्त्वावरती देणार आहे. पुणे शहरामध्ये नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने येणाऱ्या लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये घरे उपलब्ध व्हावीत, हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.
या घरांचा उपयोग प्रामुख्याने बाणेर, हिंजवडी परिसरामध्ये आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. या भागातील आयटी कर्मचारी काही ठराविक कालावधीसाठी पुण्यातील आयटी कंपन्यांमध्ये जॉबसाठी येतात. मात्र, या ठिकाणी घराचे भाडे वाढीव दराने असल्याने बहुतांश लोकांना भाड्याने घर मिळवणे अवघड जाते. अशा कर्मचाऱ्यांना या घरांचा लाभ होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच पुण्यामध्ये मोलमजुरीसाठी येणाऱ्या गरीब कुटुंबांनादेखील याचा फायदा होणार आहे. रोजगारासाठी आलेली काही कुटुंबं शहराच्या टेकड्या आणि इतर परिसरामध्ये झोपड्या करून राहतात. त्यांचीही सोय या घरांमध्ये होणार आहे.
महापालिका आयुक्तांनी या प्रकल्पाची घोषणा केली असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक योजना या फक्त कागदावरतीच राहिल्याचा अनुभव आहे. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात येणार की घोषणाच राहणार, याची पुणेकरांना उत्सुकता लागून राहिली आहे.
पुणेकरांना चांगल्या दर्जाच्या सेवा आणि सुविधा देण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. अंदाजपत्रकात पाणी, रस्ते, मलनि:सारण, उद्याने आणि आरोग्यावर भर देण्यात आला आहे. अंदाजपत्रकात महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. 550 कोटी रुपयांची तरतूद यावर्षी 23 गावांसाठी करण्यात आली असल्याचे महापालिका आयुक्त कुमार यांनी सांगितले.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.