sharad pawar corona meeting
sharad pawar corona meeting 
पुणे

कोरोना रुग्णांचे हाल : शरद पवार व अजितदादा यांनी सांगितल्यानंतरही उशिराने रुग्णालयांना नोटीस

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर अनेक नेत्यांकडे खासगी रुग्णालयांबद्दल तक्रारी झाल्या. प्रशासनाने कारवाई करावी म्हणून तोंडी बजावण्यात आले. तरीही कारवाई होत नव्हती आणि रुग्णांचे हाल संपत नव्हते. आता मात्र प्रशासनाला जाग आलू असून संबंधित रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उपलब्ध खाटांची माहिती देत नसल्यामुळे शहरातील २५ रुग्णालयांना महापालिकेने `कारणे दाखवा` नोटिस बजावली आहे.  कोरोना रुग्णांना जादा बिल आकारल्याबद्दल जहांगीर रुग्णालय तसेच हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झालेल्या ज्युपिटर रुग्णालय या दोन रुग्णालयांनाही नोटीस बजावली आहे. यापुढे हलगर्जीपणा, खोटी माहिती देणाºया खासगी रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरू असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. अनेक रुग्णालये त्यांच्याकडील खाटांची माहिती लपवित असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयां विरोधात कडक कारवाईचे धोरण स्वीकारले आहे. रुग्णालयांकडून खाटा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाणे, कोरोना रुग्णांकडून अवास्तव बिल वसूल करणे अशा अनेक तक्रारी पालिकेकडे येत आहेत.

याबाबत पुणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल म्हणाल्या,  जहांगीर रुग्णालयाला नोटीस पाठविण्यात आली.  ‘‘रुग्णाच्या उपचाराचे बिल जास्त लावल्याची तक्रार पालिकेकडे आली होती.  रुग्णालय व्यवस्थापनाने समाधानकारक उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येणार आहे. ज्युपीटर रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह आढळला.  त्याच रुग्णालयात उपचार होणे आवश्यक असताना संबंधित रुग्णाला अन्यत्र हलविण्यास सांगितले. या हलगर्जीपणामुळे त्या रुग्णाला प्राण गमवावे लागल्याची तक्रार आली. त्यामुळे या रुग्णालयालाही नोटीस बजावली आहे.’’

अनेक रुग्णालयांकडून खाटांची माहिती अद्ययावत करण्यात येत नाही. व्हेंटिलिटरयुक्त खाटांची माहितीही रुग्णालयांकडून दडवून ठेवण्यात येते. खरी माहिती न मिळाल्याने सर्वसामान्य रुग्णांची पळापळ होते. त्यामुळे ही माहिती लपविणाºया २५ रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. रुग्णालयांकडून दिल्या जाणाऱ्या माहितीची शहानिशा करण्यासाठी विविध विभागातल्या १५ अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी रुग्णालयातील उपलब्ध खाटा, कोरोना रूग्णांसाठी वापरल्या जाणाºया खाटा, व्हेंटिलेटर आदींची रुग्णालयाने दिलेली माहिती आणि प्रत्यक्षातील माहिती याची दररोज शहनिशा करणार आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT