Pune News : पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अशित वेदप्रकाश जाधव यांना मनपा सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांच्या स्वाक्षरीने हा निलंबन आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र, या आदेशात निलंबनाचे कारण स्पष्ट न केल्याने सध्या महापालिका वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
११ मार्चला नेमकं काय घडलं? वर्तुळात चर्चांना उधाण!
महापालिकेने जारी केलेल्या अधिकृत आदेशात, दिनांक 11/07/2026 रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने जाधव यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट म्हटले आहे. मात्र 11 तारखेला नेमके अशी कोणती घटना घडली, यामुळे हे निलंबन करण्यात आले याबाबत स्पष्टता आदेशात देण्यात आलेली नाही. आदेशात फक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 56(2) (फ) नुसार त्यांच्यावर विभागीय चौकशीच्या अधीन राहून ही कारवाई करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे, "त्या दिवशी पाणीपुरवठा विभागात किंवा महापालिकेत नेमकं काय घडलं होतं?" याबाबत आता महापालिका प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, या कारवाईबाबत महापालिकेमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार अवघ्या दीड महिन्यांपूर्वीच जाधव यांची पाणीपुरवठा विभागात बदली करण्यात आली होती; मात्र या बदलीवर ते प्रचंड नाराज होते. याच नाराजीतून ते महिनाभराच्या प्रदीर्घ रजेवर गेले होते. 1 जुलै रोजी ते पुन्हा सेवेत रुजू झाले, परंतु आपल्याला पाणीपुरवठा ऐवजी बांधकाम किंवा पथ विभागामध्येच बदली मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. ही बदली पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी थेट आयुक्तांवर राजकीय दबाव आणण्यासही सुरुवात केली होती, अशी चर्चा आहे.
याच बदलीसाठी त्यांनी काल जाधव यांनी थेट महापालिका आयुक्तांशी फोन आणि मेसेजद्वारे संपर्क साधला. या संपर्क प्रक्रियेदरम्यान दोघांमध्ये तीव्र वाद झाल्याचे समजते. विशेष म्हणजे जाधव यांनी आयुक्तांना पाठवलेल्या मेसेजमधील भाषा अत्यंत आक्षेपार्ह आणि चुकीची होती. आयुक्तांसोबत अशा प्रकारे हुज्जत घालणे आणि चुकीची भाषा वापरणे जाधव यांना चांगलेच भोवले आहे. या वर्तणुकीची गंभीर दखल घेत प्रशासनाने त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली असून, या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवरच ही कारवाई झाल्याचे पालिकेत बोलले जात आहे.
महापालिकेचे हद्द सोडल्यास बंदी !
अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार, निलंबन कालावधीत जाधव यांच्यावर काही बंधने घालण्यात आली आहेत. त्यानुसार जाधव यांच्याविरुद्धची खातेनिहाय चौकशीची कारवाई पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी तातडीने पूर्ण करावी, असे आदेशात म्हटले आहे. त्यासोबतच महापालिका आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय जाधव यांना महानगरपालिकेचे हद्दीक्षेत्र सोडता येणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.