Pune News : महामार्गावर ट्रक अडवायचा, कागदपत्रे तपासण्याच्या नावाखाली पैशांची मागणी करायची आणि पैसे न दिल्यास वाहन जप्त करण्याची धमकी द्यायची... मात्र, एका पोलिस अंमलदाराचा हा कथित वसुलीचा डाव त्याच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे उघडकीस आला. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील डुक्करखिंड परिसरात ट्रकचालकाकडे पाच हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी बाबुराव ढोले (वय ३५) या पोलिस अंमलदाराविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक शिवकुमार सरोज (वय २३, रा. भिवंडी, मूळ प्रयागराज) हे भिवंडी येथून माल घेऊन बंगळुरूच्या दिशेने निघाले होते. गुरुवारी सकाळी डुक्करखिंड परिसरात पोलिस अंमलदार ढोले यांनी ट्रकला ओव्हरटेक केले. स्वतःची मोटार ट्रकसमोर आडवी लावून त्यांनी चालकाला थांबवले. त्यानंतर कागदपत्रे तपासण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली.
विशेष म्हणजे, ट्रकची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतानाही पाच हजार रुपये दे, अन्यथा वाहन जप्त करण्याची कारवाई करू, अशी धमकी दिल्याचा आरोप चालकाने तक्रारीत केला आहे.
मात्र, याचवेळी या महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करण्यासाठी परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांचा संयुक्त दौरा सुरू होता. महामार्गावर अचानक गर्दी दिसल्याने दोन्ही अधिकाऱ्यांनी आपली वाहने थांबवली आणि नेमका प्रकार काय आहे, याची चौकशी केली.
चौकशीत ट्रकचालकाने आपल्याकडे पैशांची मागणी केल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधितांना वारजे पोलिस ठाण्यात नेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ढोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वारजे पोलिस करत आहेत.
महामार्गावरील वसुलीच्या या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे वरिष्ठ अधिकारी अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून वाहतूक सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे त्याच महामार्गावर पोलिस अंमलदाराकडून ट्रकचालकाला पैशांसाठी धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा सुरू नसता तर हा प्रकार उघडकीस आला असता का, असा प्रश्नही या घटनेनिमित्त उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.