Two arrested and 19 questioned in an alleged police recruitment racket involving fake sports certificates. AI Image
पुणे

Police Recruitment Racket : ३ ते ५ लाखांत पोलिस भरतीचा ‘जुगाड’? दोघांना अटक; बनावट प्रमाणपत्रांच्या रॅकेटने पुण्यात खळबळ!

Pune Police Fake Sports Certificates : बनावट खेळाडू प्रमाणपत्रांद्वारे पोलिस भरतीत घुसखोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बनावट प्रमाणपत्रासाठी तीन ते पाच लाखांचे ‘रेटकार्ड’ असल्याची चर्चा आहे.

Sudesh Mitkar

Pune News : खेळाडूंच्या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे महाराष्ट्र शासनाच्या पाच टक्के क्रीडा आरक्षणाचा गैरफायदा घेत पुणे शहर पोलिस दलात काही उमेदवारांची भरती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुराश आणि इजांगबोईट या खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे पुणे पोलिस दलात तब्बल १९ उमेदवारांची भरती झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यातील नऊ उमेदवार प्रशिक्षणासाठी रवाना झाले असून, त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.

या प्रकरणात गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर (वय ४०, रा. चंडिगड, मूळ रा. अहिल्यानगर) आणि सचिव शिवाजी जयवंत साळुंखे (वय ४६, रा. फुरसुंगी, हडपसर; मूळ रा. कोल्हापूर) यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस तपासात या बनावट प्रमाणपत्रांसाठी प्रत्येकी तीन ते पाच लाख रुपयांचे ‘रेटकार्ड’ असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

स्पर्धाच झाली नाही, तरी प्रमाणपत्रांचे वाटप!

तपासादरम्यान आणखी गंभीर बाब समोर आली आहे. कुराश असोसिएशनने दिलेल्या काही प्रमाणपत्रांमध्ये संबंधित उमेदवारांनी स्पर्धेत सहभाग घेतल्याचे दाखविण्यात आले. मात्र, २०१६ ते २०२३ या कालावधीत कुराशच्या अनेक स्पर्धाच झाल्या नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

काही उमेदवारांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतल्याचे दाखवले असले, तरी त्यांच्याकडे स्पर्धेचे रेकॉर्ड, शुल्काच्या पावत्या, विजेत्या खेळाडूंचे फोटो अथवा इतर आवश्यक कागदपत्रे नसल्याचेही तपासात आढळले आहे.

‘खेळाडू’ दाखवून पोलिस भरतीचा मार्ग मोकळा?

पुणे शहर पोलिस दलाच्या २०२४-२५ भरती प्रक्रियेत क्रीडा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी काही उमेदवारांनी ही प्रमाणपत्रे वापरल्याचा संशय आहे. शिवाजीनगर येथील पोलिस मैदानावर झालेल्या भरतीदरम्यान बनावट प्रमाणपत्रे सादर करून शासनाच्या विविध विभागांतील क्रीडा आरक्षणाचा लाभ मिळविल्याचे तपासात समोर येत आहे.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी फिर्याद दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध बीएनएसच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रीडा विभागही पोलिसांच्या रडारवर

२०२० नंतरच्या शासकीय परिपत्रकानुसार प्रत्येक राज्यस्तरीय स्पर्धेत शासनाचा प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. मात्र, कुराश असोसिएशनने शासनाच्या क्रीडा विभागाला न कळवता परस्पर स्पर्धा घेतल्याचा आरोप आहे.

या स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडू योग्य प्रमाणपत्रधारक आहेत का, याची खात्री न करता प्रमाणपत्रे देण्यात आल्याची तक्रार आहे. त्यामुळे क्रीडा विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही भूमिका तपासली जाण्याची शक्यता आहे.

अध्यक्ष-सचिवांकडून आणखी किती प्रमाणपत्रे?

पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही पदाधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून, त्यांनी आतापर्यंत किती बनावट प्रमाणपत्रे वितरित केली, त्यातून किती जणांना शासकीय नोकऱ्या मिळाल्या आणि या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. कुराश या क्रीडाप्रकाराची बनावट प्रमाणपत्रे सादर करून काही उमेदवार खेळाडू कोट्यातून पोलिस भरतीत पात्र झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली असून, गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे,” अशी माहिती पोलिस उपायुक्त (गुन्हे) गोहर हसन यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT