Keshav Gholve
Keshav Gholve Sarkarnama
पुणे

भाजपचे नगरसेवक घोळवेंविरुद्धच्या गुन्ह्यात पोलिसांचा यू टर्न, का?

उत्तम कुटे- सरकारनामा ब्युरो

पिंपरी : खंडणी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) सत्ताधारी भाजपचे (BJP) नगरसेवक आणि माजी उपमहापौर केशव घोळवेंसह (Keshav Gholve) पाचजणांना पिंपरी पोलिसांनी (Pimpri-Police) बुधवारी (ता. २ फेब्रुवारी) अटक केली होती. त्यांची मंगळवारपर्यंत (ता. ८ फेब्रुवारी) पोलिस कोठडी होती. त्यामुळे पोलिस ती वाढवून मागण्याची पुन्हा शक्यता होती. मात्र, त्यांनी ती न मागता आरोपींना चक्क न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली. परिणामी घोळवेंच्या वकिलांना पोलिस कोठडीला विरोध करावा लागणारा युक्तिवाद करावाच लागला नाही. त्यामुळे घोळवेंसह सर्वच आरोपींना न्यायालयीन कोठडी (Judicial custody) मिळून त्यांची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात (Yerawada jail) करण्यात आली. पोलिसांनी अचानक घेतलेल्या या यू टर्नविषयीच न्यायालय परिसरात खमंग चर्चा नंतर ऐकायला मिळाली.

दरम्यान, न्यायालयीन कोठडी मिळताच घोळवे यांचे वकील अॅड. एन.डी.पाटील यांनी लगेचच जामीनासाठी अर्ज दिला. त्यावर बुधवारी (ता.९ फेब्रुवारी) सकाळी पिंपरी न्यायालयात सुनावणी होणार आहे. पोलिसांची आजची भूमिका पाहता उद्याही ते घोळवेंच्या जामीनाला कडाडून विरोध करण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे त्यांना आठ दिवसांच्या जेलनंतर आता बेल होण्याची शक्यता आहे.

गुन्हा नोंदविलेल्या दिवशीच (ता.२ फेब्रुवारी) पिंपरी पोलिसांनी कामगार नेतेही असलेल्या घोळवेंना अटक करण्याची घाई केली होती. मग, आता त्यांची पोलिस कोठडी मागण्याऐवजी न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करून त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा करून का दिला, असे काय घडले, याची कुजबूज न्यायालयच नाही, तर शहराच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे घोळवेंविरुद्धचा गुन्हा हा बॉडी ऑफेन्स प्रकारातला नसल्याने त्यात त्यांना तातडीने अटकेची घाई करण्याची गरज व आवश्यकता नव्हती, असे कायदातज्ज्ञांचेही मत आहे. तसेच गुन्ह्यातील घटना ही तीन वर्षे जुनी आहे. मग, जेवढ्या घाईने अटकेची कारवाई केली, मग आता त्यांना सोडण्याची घाई का पोलिसांनी सुरु केली आहे, याबाबत सर्वसामान्यांनाही आश्चर्य व्यक्त केले आहे.

पोलिसांच्या घोळवेंसंदर्भातील यू टर्नचा अभ्यास केला असता त्यामागे काही कारणे दिसून आली. एकतर, त्यांच्याविरुद्ध जो खंडणी तथा महापालिका मुख्यालयाजवळील नेपाळी मार्केटमधील शंभर गाळेधारकांकडून हफ्तेखोरीचा गुन्हा नोंद झाला आहे. त्याबाबत पहिली आवई ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा ज्येष्ठ नगरसेवक हाच ती या मार्केटमधील गाळेधारका संघटनेच्या परप्रांतीय पदाधिकाऱ्यांच्या मार्फत करीत असल्याची उठली होती. त्यामुळे त्यात घोळवेंना अटक होताच भाजपच्या महापौर माई ऊर्फ उषा ढोरे आणि सभागृहनेते नामदेव ढाके यांनी पिंपरी पोलिस ठाण्यासमोर खोटा गुन्हा नोंदविल्याबद्दल निषेध करीत त्याच दिवशी आंदोलन केले होते. तसेच, हे हफ्ते घेत असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी गाळेधारकांची लेखी तक्रार करून केली होती. घोळवेंविरुद्ध ज्या गाळेधारकाने खंडणीची तक्रार दिली आहे, तोच राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या मदतीनने ही हफ्तेवसुली करीत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

दरम्यान, घोळवेंच्या अटकेनंतर तीनच दिवसांनी असाच फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेले भाजपचे शहरातील नेते व पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांना या गुन्ह्याच्या ताणामुळे ह्रदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचा बळी गेला. त्यामुळे प्रचंड आक्रमक झालेल्या भाजपने राज्यातील महाविकास आघाडी सरकार व पोलिसांवर पुन्हा कडाडून हल्लाबोल केला. त्यामुळे पोलिसांना दोन पावले माघार घ्यावी लागल्याचे समजते. दरम्यान, चिंचवडेंच्या मृत्यूनंतर पुण्यात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याने भाजपकडून पुन्हा राज्य सरकार लक्ष्य झाले. परिणामी बचावाच्या पवित्रा पोलिसांना घ्यावा लागला. तसेच घोळवे प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरुद्ध कारवाई करण्याची पाळी येऊ नये म्हणूनही घोळवेंच्या पोलिस कोठडीला त्यांनी विरोध केला नसल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे.

चिंचवडेंविरुद्धचा गुन्हा, तर पन्नास वर्षे जुना व दिवाणी स्वरुपाचा आहे. असे गुन्हे पोलिस सहसा नोंदवून घेत नाहीत. न्यायालयात जा, असे ते सर्वसामान्यांना सांगतात. मग चिंचवडेविरुद्धच तो गेल्या महिन्याच्या २५ तारखेला का दाखल झाला, याबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी शंका उपस्थित झाली होती. तर, अशाच संशयास्पद तिसऱ्या व त्याही फसवणुकीच्याच गुन्ह्यातील शहर पोलिसांच्या कारवाईने, तर त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यातच उभे केले आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अरुण पवार यांनाही पाच वर्षे जुन्या गुन्ह्यात शहर पोलिसांच्या सांगवी पोलिस ठाण्याने तत्पर अटक केली. कारण त्यातील फिर्यादी हे स्थानिक भाजप आमदारांचे भाचे संतोष कवडे हे आहेत. मात्र, नमूद करण्याजोगी बाब म्हणजे कवडे हेच आपल्याला धमकावून ब्लॅकमेल करीत असल्याच्या अनेक तक्रारी पवार यांनी गेल्या वर्षभरात सांगवीचे सिनिअर पीआय, वाकड विभागाचे एसीपी, डीसीपी ते थेट सीपी कृष्णप्रकाश यांच्यापर्यंत केल्या होत्या. मात्र, त्याची दखल न घेता त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीची, मात्र लगेचच ती घेण्यात आली. हा गुन्हाही खोटा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे स्थानिक माजी नगरसेवक राजेंद्र जगताप व पवार यांचे बंधू बालाजी यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT