dattateray Bharane_harshvardhan patil
dattateray Bharane_harshvardhan patil sarkarnama
पुणे

भरणे म्हणतात, ‘माझ्याकडे डावाला प्रतिडाव’...आता हर्षवर्धन पाटील कोणता नवा डाव टाकणार?

विनायक चांदगुडे

शेटफळगढे (जि. पुणे) : इंदापूर तालुक्यात आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात राजकीय कुस्ती रंगणार आहे. या कुस्तीत भरणे व पाटील यांच्यापैकी कोण कोणाला राजकीय आखाड्यात चितपट करणार? याची उत्सुकता इंदापूरबरोबरच जिल्ह्यातील जनतेलाही लागली आहे. (Political match between Dattatreya Bharne and Harshvardhan Patil will played again in Indapur)

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणी स्पर्धेचे इंदापूर तालुक्यात नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी राज्यमंत्री भरणे यांनी ‘माझ्याकडे डावाला प्रतिडाव असतो. विरोधकांचे डाव कसे पलटवायचे, हे मला चांगले माहीत आहे,’ अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते. मागील पंधरा दिवसांच्या भरणे व पाटील यांच्या शांत झोपेच्या विषयाच्या चर्चेनंतर आता माझ्याकडे डावाला प्रतिडाव आहे, हे भरणे यांचे वक्तव्य इंदापुरात गाजत आहे.

आगामी चार महिन्यांत इंदापूर तालुक्यात होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकीला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत पाटील व भरणे या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यातच भरणे हे सध्या राज्य मंत्रिमंडळात असल्याने कसल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणून पंचायत समिती ताब्यात घेण्याचे प्रयत्न होऊ शकतात, त्यामुळे भरणे यांच्या दृष्टीने या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. ‘विरोधक संपले असून त्यांच्या हातात आता निधी द्यायला काही राहिले नाही,’ अशी भाषा पाटलांचे राजकीय विरोधक जाहीर कार्यक्रमातून बोलून दाखवत आहेत. त्यामुळे विरोधक कधी संपत नसतो, हे आगामी निवडणुकांद्वारे उमेदवारांच्या विजयातून हर्षवर्धन पाटील यांना दाखवावे लागणार आहे. पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने आगामी निवडणुकीला विशेष महत्त्व आहे.

भरणे व पाटील या दोघांच्याही वतीने एकमेकांवर भारी ठरण्यासाठी वेगवेगळे राजकीय डाव टाकले जातील. त्यातही पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटाच्या भौगोलिक सीमा बदलणे, आपल्या पक्षाला अनुकूल असणारी गावे जय पराजयाच्या अल्प मताच्या फरकावर असणाऱ्या गटामध्ये टाकणे, सक्षम उमेदवार देणे, गावोगावचे कार्यकर्ते फोडाफोडी करणे यांसारखे राजकीय डावपेच आगामी दोन-तीन महिन्यांच्या काळामध्ये या दोघांच्या वतीने टाकले जाणार आहेत. याशिवाय शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न, खडकवासला व नीरा डावा कालव्याची आवर्तने, गावोगावी होणारी विकास कामे, शेतीपंपांचे विजजोड तोडणे या देखील मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांचे डावपेच एकमेकांवर टाकले जाणार आहेत, त्यामुळे भरणे व पाटील यांच्या आगामी निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यकर्ते नाराजीचा लंगोट लावून तयार

आगामी निवडणुकीत भरणे व पाटील यांच्यात होणारी राजकीय कुस्ती गावोगावचे कार्यकर्ते असणाऱ्या पहिलवानांच्या जोरावर लढवली जाणार आहे. सत्ता असो वा नसो दोघांचेही पहिलवान सध्या नाराज असले तरी आपापल्या नेत्यांच्या तालमीतच तळ ठोकून आहेत. महत्त्वाच्या निवडणुकीत गावातून मताधिक्य देऊनही या पहिलवानांना गावच्या विकास कामांसाठी मतदानाच्या प्रमाणात पुरेसा निधीचा खुराक मिळालेला नाही. माळा बाहेरच्या देवाला वर्षातून जसा एकदा नैवेद्य दिला जातो, तसा किरकोळ निधीचा नैवेद्य गावासाठी दिला जात असल्याने पहिलवान कार्यकर्ते नाराज आहेत. काहीजण साखर कारखान्याला उमेदवारी दिली नाही; म्हणून नाराज आहेत. आपण आपल्या गावात सक्षम असूनही आपल्या नेत्यांनी दुसऱ्याला ताकद देऊन पर्यायी राजकीय पहिलवान तयार केल्यानेही काहीजण नाराज आहेत. पण, बोलले तर वाईट होतोय, हा अनुभव असल्याने ही सर्व नाराजी घेऊन गावोगावचे पहिलवान कार्यकर्ते नाराजीचा लंगोट लावून दबा धरून बसले आहेत. त्यामुळे याचा फटका कोणाला बसणार? यावरच भरणे व पाटील यांच्या राजकीय कुस्तीचा निकाल अवलंबून आहे.

भरणे अजितदादांची मदत घेणार का?

इंदापूर तालुक्यातील नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या आखाड्यात आजवर राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उमेदवारांच्या विजयासाठी मदत घ्यावी लागली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे कायमच स्वबळावर राष्ट्रवादीशी लढले आहेत. या वेळी भरणे हे राज्यमंत्री आहेत, त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विजयासाठी व विरोधकांना राजकीय आखाड्यात चितपट करण्यासाठी पवार यांची मदत घेणार का? की एकटेच विरोधकांना चितपट करणार? याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT