Porsche Crash Case Sarkarnama
पुणे

Porsche Crash Case: तीनशे शब्दांचा निबंध भोवला; दोन डॉक्टरांच्या निलंबनानंतर तपासाची चक्रे आता बाल न्याय मंडळाकडे

Pune Hit And Run Case Update: अल्पवयीन कारचालकाला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासह विविध अटींवर जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सरकारनियुक्त सदस्यांची चौकशी केली जाणार आहे.

Mangesh Mahale

‘पोर्श’ कार अतिवेगाने चालवून दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन कारचालक (pune porsche car) मुलाला अवघ्या पंधरा तासांत जामीन मिळाला होता, याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. समाजमाध्यमांवरही देशभरातून अनेकांनी त्याचा निषेध व्यक्त केला. पुण्यातील 'कार'नामा चर्चेत असताना आज ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. आता तपासाची चक्रे बाल न्याय मंडळाकडे वळली आहे.

अल्पवयीन मोटार चालकाला काही तासांत जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळातील सदस्यांची चौकशी केली जाणार असल्याचे महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासह विविध अटींवर बाल न्याय मंडळाने त्याला जामीन दिला होता.

या जामीनाचा पुनर्विचार करण्यासाठी पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे अर्ज केला. त्यानंतर बाल न्याय मंडळाने आपल्या आदेशात दुरुस्ती करून सुरक्षेच्या कारणास्तव या मुलाला पाच जूनपर्यंत बालनिरीक्षण गृहात ठेवण्याचा आदेश दिला. सध्या संबधीत मुलगा बालनिरीक्षण गृहात आहे. मुलाला पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश मंडळाने दिला आहे. अल्पवयीन कारचालकाला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासह विविध अटींवर जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सरकारनियुक्त सदस्यांची चौकशी केली जाणार आहे.

महिला व बालविकास विभागाने बाल न्याय मंडळातील सदस्यांची चौकशी करण्यासाठी २२ मे रोजी समिती स्थापन केली आहे. समितीने आत्तापर्यंत अनेक कागदपत्रांची तपासणी केली आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यातील तरतुदींनुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे प्रमुख उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत.

मुलगा अल्पवयीन असल्याचे त्याच्या वकिलांनी मंडळाच्या निदर्शनात आणून दिले. त्यामुळे मंडळाने त्वरित मुलाला जामीन मंजूर केला होता. मात्र त्यात असलेल्या अटींमुळे या निकालावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे मंडळाने आपल्या आदेशात दुरुस्ती करून मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्याची विनंती पोलिसांनी केली होती. त्यानुसार मुलाला पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश मंडळाने दिला आहे.

चौकशी समिती आठवडाभरात अहवाल तयार करणार आहे. हा अहवाल उच्च न्यायालय आणि राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. अहवालात नमूद असलेल्या बाबींनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे नारनवरे यांनी सांगितले. बाल न्याय मंडळातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. रविवार असूनही मंडळातील नियुक्त सदस्य कार्यालयात आले कसे? हे तपासल्यानंतर या प्रकरणात आणखी नवीन खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT