Nana Patole On Pune Hit And Run Case Sarkarnama
पुणे

Pune Hit And Run Case: नाना पटोलेंचे बोट कुठल्या आमदाराच्या दिशेने?

Jagdish Patil

Porsche Hit And Run Case Update: पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे खुलासे होत आहेत. तर विरोधकांनी या अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पुणे पोलिस आयुक्तालयात येऊन तपासाची सूत्रे फिरवल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी केला होता. अशातच आता पटोले यांनी या प्रकरणात एका आमदार पुत्राचा समावेश असल्याचा मोठा दावा केला आहे.

पुण्यात (Pune) ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे दोन गाड्यांमध्ये रेस लागली होती. त्यातील एका गाडीत आमदाराचा मुलगा असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. तसंच सरकारने या प्रकरणाची चौकशी करायला पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. याप्रकरणी माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, "पुण्यातील त्या पबमधून दोन गाड्या निघाल्या होत्या. या गाड्यांमध्ये रेस लागली होती. एक गाडी पुढे गेली आणि जी गाडी मागे राहिली त्या गाडीने दोघांना चिरडलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, जी गाडी पुढे गेली त्यात एका आमदाराचा मुलगा होता. आता तो आमदार कोण हे मुख्यमंत्र्यांनी सांगितल पाहिजे. या काळात मुख्यमंत्री सुट्टी घेऊन गेले आहेत. तर दोन उपमुख्यमंत्री जनतेच्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत." तर पटोलेंच्या (Nana patole) या दाव्यामुळे त्यांचा रोख नेमका कोणत्या आमदाराकडे आहे. याबाबत विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

डॉ. अजय तावरे यांच्या जिवाला धोका

तसंच डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware) यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची काळजी सरकारने घेतली पाहिजे. तावरेंशी कोणता पोलिस (Police) बोलत होता याची चौकशी झाली पाहिजे. सहाव्या मजल्याचं कनेक्शन आहे, असं बोललं जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. कारण आता जे पोलिस महासंचालक आहेत त्यांच्यावर फोन रेकॉर्डिंगचे आरोप आहेत, असा हल्लाबोल पटोले यांनी केला.

तपासात धक्कादायक खुलासे

कल्याणीनगर अपघात (Kalyaninagar Accident) प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे तपासणीसाठी दिलेले रक्ताचे नमुने ससून हॉस्पिटलमध्ये बदलण्यात आले. हॉस्पिटलमधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांनी तीन लाख रूपयांची लाच घेऊन रक्ताचे नमुने बदलल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांसह अन्य एका व्यक्तीला अटक केली. याच पार्श्वभूमीवर आता विरोधकांनी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच पोलिसदेखील या कटात सहभागी असल्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT