पुणे : महापारेषण कंपनीच्या पिंपरी चिंचवडमधील भोसरी येथील अतिउच्चदाब उपकेंद्रात बुधवारी (ता. २३) सकाळी ६ वाजताच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे शहरातील भोसरी व आकुर्डीमधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा (Electricity) सध्या बंद आहे.त्यामुळे ऐन उन्हाळ्यात रहिवाशांची प्रचंड होरपळ सुरू आहे. दुसरीकडे भोसरी एमआयडीसीतील यंत्रांची धडधडही थांबल्याने कोट्यवधी रुपयांचा फटकाही बसण्याची शक्यता आहे.
भरीस भर म्हणजे विजेच्या वाढत्या मागणीमुळे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने पर्यायी वीजपुरवठ्याची सोय देखील उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे दुपारपर्यंत ही होरपळ सुरुच राहणार आहे. दुसरीकडे पर्यायी किंवा इतर तांत्रिक उपाययोजनेतून वीजपुरवठा कमीत कमी कालावधीसाठी बंद राहील यासाठी महावितरणचे (Mahavitaran) युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र विजेच्या वाढत्या मागणीमुळे भारव्यवस्थापनात अडचणी येत आहे. त्यामुळे वीज न गेलेल्या ग्राहकांनी विजेचा कमीत कमी वापर करावा अशी विनंती करण्याची पाळी 'महावितरण'वर आली आहे.
भोसरीमधील गवळी माथा येथील १०० एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आज सकाळी बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या एकूण १० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी प्रामुख्याने भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील ४,५०० औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे. बिघाड झालेला ट्रान्सफॉर्मर पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्यास आल्यास तो बदलण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे भोसरी विभागातील वीजपुरवठ्याची स्थिती अधिकच विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
एकाच पॉवर ट्रान्सफॉर्मरवरून विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने भोसरी विभागात चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करून सर्व ग्राहकांना वीजपुरवठा करावा लागणार आहे. मात्र अशी स्थिती १०० एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्यासच उद्भवू शकते अशी माहिती महापारेषणकडूनन देण्यात आली. तथापि याबाबत नेमकी स्थिती दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापारेषण व महावितरण यांच्याकडून करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.